थोडक्यात
नेपाळच्या अर्थमंत्र्यांना मारहाण
आंदोलकांनी पाठलाग करत केली मारहाण
मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल
नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी भीषण हिंसक वळण लागले असून, पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी अखेर राजीनामा दिला आहे. वाढत्या असंतोषामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून, लष्कराने ओली यांना सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टरने अज्ञातस्थळी हलवले आहे. राजधानी काठमांडूसह विविध भागांमध्ये झालेल्या संघर्ष, जाळपोळ आणि हल्ल्यांमुळे देशभरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या हिंसाचारात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असून, 400 हून अधिक जण जखमी झाले आहेत. आंदोलकांचा संताप इतका प्रचंड होता की त्यांनी थेट संसद भवनाला आग लावली. तसेच पंतप्रधान ओली, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि गृहमंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानांवर हल्ला करून तोडफोड केली व आगीच्या भक्ष्यस्थानी दिले.
संतप्त जमावाने माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना उघड्यावर मारहाण केल्याचे वृत्त आहे. याशिवाय अर्थमंत्री विष्णू पौडेल यांच्यावरही हल्ला करण्यात आला. काठमांडूमधील त्यांच्या घराजवळ आंदोलकांनी त्यांचा पाठलाग करून मारहाण केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पौडेल यांच्या छातीवर निदर्शक लाथ मारताना दिसत आहे.
याचदरम्यान, निदर्शकांनी माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’, शेर बहादूर देउबा आणि दळणवळण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या खाजगी निवासस्थानांनाही आग लावली. राजधानी आणि आसपासच्या भागात पोलिस आणि आंदोलकांमध्ये तुफानी संघर्ष होत असून, सुरक्षादलांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नेपाळमध्ये निर्माण झालेली ही राजकीय आणि सामाजिक अस्थिरता देशाला मोठ्या संकटात लोटत असून, आगामी घडामोडींकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.