जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रहार शिक्षक संघटनेच्या ठाम भूमिकेनंतर ग्रामविकास विभाग हालचालीत आला असून बदल्यांचा सातवा टप्पा लवकरच सुरू केला जाणार आहे.
संघटनेने बदल्या तात्काळ न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर विभागाने सर्व जिल्ह्यांच्या शिक्षण अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या आहेत. बदल्या सुरू करण्यापूर्वी शिक्षकांचे रोस्टर अद्ययावत करणे, रिक्त जागांची माहिती निश्चित करणे आणि ठराविक टक्केवारीनुसार पदे उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रक्रियेत आधी आंतरजिल्हा बदल्या आणि त्यानंतरच नवीन भरती केली जाणार आहे. उपलब्ध व संभाव्य रिक्त पदांचा विचार करून पुढील टप्पे राबवले जातील. अखेर अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना दिलासा मिळणार असून संघटनेच्या प्रयत्नांना यश आले आहे.