भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. “राहुल गांधी दरवेळी निवडणूक हरणार आणि मग म्हणणार यादी चुकीची होती, मशीन बंद पडलं, मशीन चुकलं… पण आता मी त्यांना खुलं आव्हान देतो की, येणाऱ्या महापालिका-नगरपालिका निवडणुकांच्या यादीवर काँग्रेसनं आक्षेप घ्या. नाहीतर नंतर रडू नका,” असे बावनकुळे ठणकावून म्हणाले.
शेतकऱ्यांच्या नुकसानीवर दिलासा
आपल्या भाषणाची सुरुवात करताना बावनकुळे म्हणाले, “ठिकठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. घरं पडली आहेत, जनावरं वाहून गेली आहेत, वित्तहानी झाली आहे. या सगळ्याचा पंचनामा करून NDRF आणि SDRF च्या नॉर्म्सप्रमाणे भरपाई द्यावी, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.”
“जे खायचं ते खा, आम्हाला काही घेणंदेणं नाही”
काँग्रेसवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, “महाराष्ट्राला शाखा बनवण्याचा डाव सुरू आहे. कालही सांगितलं होतं आणि आजही सांगतो – ज्याला जे खायचं ते खा. ज्यांना व्हेज खायचं त्यांनी व्हेज खा, नॉन-व्हेज खायचं त्यांनी नॉन-व्हेज खा, अजून काही खायचं असेल तेही खा. पण आम्हाला कुठं काही नाहीये.”
राहुल गांधींच्या यात्रेवर टीका
राहुल गांधींवर तुफान टीका करत बावनकुळे म्हणाले, “राहुल गांधी अधिकारी यात्रा काढत आहेत. पण यात दम नाही. निवडणुकीच्या वेळी मतदारयादी जाहीर होते. निवडणूक आयोग सात दिवस यादी खुली ठेवतो. महाराष्ट्रात एक लाख बूथवर या यादी लावल्या होत्या. त्या वेळी काँग्रेसच्या एका नेत्यानेसुद्धा आक्षेप घेतला नाही. मतदान झालं, पेट्या सील झाल्या, काउंटिंग झालं – तरी कुठेच आक्षेप घेतला नाही. सात महिन्यांनंतर राहुल गांधी म्हणतात की यादी चुकली! मग त्या यादीवरूनच 31 खासदार काँग्रेसचे कसे काय निवडून आले? त्यावेळी यादी बरोबर होती आणि मशीनसुद्धा बरोबर होती. पण ज्या ठिकाणी भाजप जिंकते, तिथेच यादी चुकीची, मशीन खराब असं का?”
काँग्रेसला खुलं आव्हान
बावनकुळे यांनी काँग्रेसला थेट आव्हान दिलं:
“आता महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका या विधानसभेच्या यादीवर होणार आहेत. प्रत्येक वार्ड-प्रभागाची यादी लावली जाईल. काँग्रेसनं सगळी ताकद लावून त्यावर आक्षेप नोंदवावे. नाहीतर नंतर म्हणायचं – मुंबईत वन साइड महायुती, पुण्यात वन साइड महायुती, नागपूरसह सगळ्या ठिकाणी महायुतीचं वर्चस्व. मग राहुल गांधी म्हणतील मतदार यादी चुकली, मशीन चुकली. त्यामुळे आताच अलर्ट व्हा.”
काँग्रेसमध्ये दररोज फुटी
काँग्रेसच्या गळतीवर भाष्य करत बावनकुळे म्हणाले,“काल मोर्शी-वरुडमध्ये विक्रम ठाकरे ४ हजार कार्यकर्त्यांसह काँग्रेस सोडून गेले. उत्तर महाराष्ट्रात कुणाल पाटील, मराठवाड्यात सुरेश वरपुळकर, पश्चिम महाराष्ट्रात थोरात-परिवार, जगताप-परिवार – सगळ्यांनी काँग्रेस सोडली आहे. विदर्भात कधी बॉम्बस्फोट होईल सांगता येत नाही. काँग्रेसमध्ये लोक राहायला तयार नाहीत.”
महायुती सरकारवरील विश्वास
लोकसभेत कमी जागा मिळाल्या पण विधानसभेत विजय मिळाला याचं श्रेय देताना बावनकुळे म्हणाले, “आम्ही अडीच कोटी लाडक्या बहिणींना योजना दिली. ४५ लाख शेतकऱ्यांची वीज बिलं माफ केली. लोकांनी विचार केला – जर महायुती सरकार आलं तर योजना सुरू राहतील. म्हणून जनतेनं महायुतीला मतदान केलं.”
राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
भाषणाचा शेवट करताना बावनकुळे यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केला. “राहुल गांधींवर देशात प्रश्नचिन्ह उभं आहे. ते देशाला दिशा दाखवू शकत नाहीत. मोदीजींनी 2047 मध्ये विकसित भारताचा संकल्प केला आहे. पण राहुल गांधींकडे काहीच विजन नाही. त्यामुळे त्यांचं नेतृत्व संपण्याच्या मार्गावर आहे. मशीनवर आणि मतदारयादीवर दोष टाकून काँग्रेस आपलं अस्तित्व वाचवते आहे. पण लोकांनी त्यांना नाकारलंय, हे त्यांना मान्य करावंच लागेल.”