आता कोल्हापूरकरांना कोल्हापूर ते मुंबईपर्यंत एसी आरामदायी रेल्वे गाडीतून प्रवास करता येणार आहे. मुंबई ते कोल्हापूर अशी वंदे भारत ट्रेन सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या मानाने रेल्वेची संख्या कमी आहे. सध्या पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत सेवा आधीच सुरु आहे. मात्र ती गाडी केवळ पुणे-कोल्हापूर धावत असल्यामुळे प्रवासी नाराज होते. मुंबईपर्यंत ही वंदे भारत सेवा मिळावी, अशी मागणी होत होती. त्याच अनुषंगाने आता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळेच मुंबई-कोल्हापूर प्रवास हा अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे.
क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये या निर्णयाला परवानगी देण्यात आली. कोल्हापूरला साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. या प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यात कोल्हापूर ते मुंबई मार्गावर चालणारी सह्याद्री एक्सप्रेस ही बंद झाली. त्यामुळे लोकांना तसेच पर्यटकांना मुंबईवरून कोल्हापूरकडे येण्यासाठी वंदे भारत ही ट्रेन सुरु करावी, अशी मागणी होत होती. त्या मागणीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने या ट्रेनला मुंबईपर्यंत जाण्यासाठी मान्यता दिली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनीही या रेल्वे मंजुरीसाठी खास पाठपुरावा केला होता.
रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सांगितले की, “ही रेल्वे कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास करेल आणि त्याच अनुषंगाने त्या ट्रेनचे वेळापत्रकही जाहीर करण्यात येईल. ही ट्रेन येत्या 15 दिवासात सुरु करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोल्हापूर ते मुंबई चे 11 तासांचे अंतर अवघ्या 7 तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या 8 डब्यांच्या वंदे भारत रेल्वेमध्ये स्वयंचलित दरवाजे आहेत. त्यामुळे आता कोल्हापूरकरांनाही वंदे भारतची सफर घडणार आहे.
हेही वाचा