थोडक्यात
भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा कमी दबाचा पट्टा निर्माण
पुढील काही दिवस पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार
जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला
भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा कमी दबाचा पट्टा निर्माण झाला आहे, (Rain Alert) एक पश्चिमेकडे आणि दुसरा पूर्वेकडे असे दोन कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये आता भारतीय हवामान विभागाकडून (IMD) अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, महाराष्ट्रात देखील पुढील काही दिवस पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पश्चिमेला कच्छच्या खाडीमध्ये आणि उत्तर-पूर्वेला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, हा कमी दाबाचा पट्टा पुढील काही तासांमध्ये आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून अनेक राज्यांमध्ये वाऱ्याच्या प्रचंड वेगासह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 55 ते 60 किमी इतका प्रचंड असणार आहे. हा कमी दबाचा पट्टा पुढील काही तासांमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा धोका वाढला आहे.
अरबी समुद्र, कच्छची खाडी आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशात दहा ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम असणार आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
कोणत्या राज्यात होणार पाऊस?
स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, ज्यामध्ये पच्छिम बंगाल, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्रात आधीच पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे, त्यातच आता पु्न्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, चिंता वाढली आहे, आज देखील नाशिकसह अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.