"मी शिवाजीराजे भोसले बोलतोय", या 2009 मध्ये गाजलेल्या चित्रपटानंतर दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनमानसात छत्रपती शिवाजी महाराजांची तेजस्वी आठवण जागवणार आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या "पुन्हा शिवाजीराजे भोसले", हा चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख आज दुपारी 2 वाजून 32 मिनिटांनी अधिकृतरीत्या जाहीर होणार आहे.
सोशल मीडियावर एक रील सध्या जोरदार व्हायरल होत असून, त्यात "राजे येणार..., तारीख आज कळणार!", असा उल्लेख आहे.
याआधी जून महिन्यात शिवराज्याभिषेक दिनाच्यानिमित्ताने या चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आला होतं. "महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो!", या घोषवाक्यासह मांजरेकरांनी या चित्रपटाची घोषणा केली होती.
चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी स्वतः केले असून, निर्मितीची धुरा राहुल पुराणिक व राहुल सुगंध यांनी सांभाळली आहे. तर संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांचे आहे.
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारणार आहेत. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने नाव कमावलेल्या बोडके यांना आता शिवरायांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली आहे. बालकलाकार त्रिशा ठोसर यांचाही चित्रपटात महत्त्वाचा सहभाग आहे.
चित्रपटात नेमके कोणते सामाजिक व राजकीय विषय मांडले जाणार याबाबत माहिती गुप्त ठेवण्यात आली असली, तरी हे निश्चित आहे की महाराष्ट्रच या कथेचा मध्यवर्ती केंद्रबिंदू असणार आहे. आजच्या महाराष्ट्रातील मूलभूत आणि अनुत्तरित प्रश्नांवर चित्रपट भाष्य करणार आहे.
चित्रपटाची आठवण
2009 साली आलेल्या "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय", चित्रपटात महेश मांजरेकर यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यासोबत मकरंद अनासपुरे (रायबा), सचिन खेडेकर (दिनकर भोसले), सुचित्रा बांदेकर (सुमित्रा), अभिजीत केळकर (राहुल), प्रिया बापट (शशिकला) आणि विद्याधर जोशी (रमणिकलाल) यांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीत एक अमिट ठसा उमटवून गेला होता.
"पुन्हा शिवाजीराजे भोसले!", या नव्या अध्यायातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा शिवरायांची अस्मिता, विचार, आणि प्रेरणा अनुभवता येणार आहे. यामुळे यशाबाबत कोणतीही शंका नाही आणि हा चित्रपटही निश्चितच मराठी सिनेसृष्टीत नवा विक्रम प्रस्थापित करेल, अशी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. शिवप्रेमींनी सज्ज व्हा, कारण राजे पुन्हा येत आहेत… "पुन्हा शिवाजीराजे भोसले!"
हेही वाचा