देशात प्रजासत्ताक दिनाच्या तयारीला वेग आला असताना, भारतावर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याचा गंभीर इशारा गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आला आहे. २६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या पार्श्वभूमीवर सीमेपलीकडून भारताविरोधात मोठा कट रचला जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिल्लीसह एनसीआर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाल्या आहेत.
गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि कॅनडामधील काही खलिस्तानी समर्थक आणि दहशतवादी संघटना थेट भारतात घुसखोरी न करता देशातील स्थानिक गुन्हेगारांचा वापर करत आहेत. हे गुन्हेगार ‘हायब्रिड फुट सोल्जर’ म्हणून काम करत असून, ते स्लीपर सेलप्रमाणे दीर्घकाळ शांत राहून योग्य संधीची वाट पाहत असल्याचे सांगण्यात येत आहे. या माध्यमातून राजधानी दिल्ली, एनसीआर तसेच देशातील अन्य मोठ्या शहरांना लक्ष्य करण्याचा कट आखला जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या गँगस्टर्सकडून शस्त्रास्त्रांची वाहतूक, गुप्त माहिती संकलन आणि रसद पुरवठा यासारखी कामे केली जात असल्याचे समोर आले आहे. बदल्यात सीमेपलीकडून त्यांना अत्याधुनिक शस्त्रे, आर्थिक मदत आणि लॉजिस्टिक सपोर्ट दिला जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. विशेषतः पंजाबमधील काही गुंडांचा वापर मोहरा म्हणून केला जात असून, हे गुन्हेगार हरियाणा, दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सक्रिय असल्याचेही सांगण्यात येत आहे.
या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्ली मेट्रो स्थानके, कश्मीरी गेट, बस स्थानके, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा आणि गर्दीची ठिकाणे येथे अतिरिक्त पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत. संशयास्पद व्यक्ती, वाहनं आणि वस्तूंवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, ठिकठिकाणी तपासणी मोहीम सुरू आहे. लाल किल्ला, चांदणी चौक आणि इतर संवेदनशील भागांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येत असून, आपत्कालीन परिस्थितीत कसे प्रतिसाद द्यायचे याचा सराव केला जात आहे. ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक साधनांच्या मदतीने देखरेख वाढवण्यात आली आहे.
प्रशासनाकडून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही संशयास्पद बॅग, वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना किंवा जवळच्या सुरक्षा यंत्रणेला कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिन शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडावा यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत.