नांदेड जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाणारा सहस्त्रकुंड धबधबा पावसाच्या संततधारांमुळे ओव्हरफ्लो झाला आहे. पैनगंगा नदी धोक्याची पातळी सोडून प्रचंड वेगाने वाहत असल्याने धबधब्याचे रौद्र रूप पर्यटकांना पाहायला मिळत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी हजारो पर्यटक गर्दी करतात. यंदाही धबधब्याचे सौंदर्य पाहण्यासाठी स्थानिकांसह दूरदूरहून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. पाणी पातळी अचानक वाढल्याने आणि प्रवाह अधिक तीव्र झाल्याने पर्यटकांसाठी धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धबधब्याजवळ अनावश्यक गर्दी करू नये, पाण्यात उतरू नये आणि सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. पोलिस व महसूल विभागानेही पर्यटकांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून सुरक्षिततेसाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
निसर्गाच्या या अद्भुत देखाव्याचा आनंद घेताना खबरदारी घेणे आवश्यक आहे, अन्यथा आनंददायी सहल अपघाताचे रूप घेऊ शकते, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.