मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला असून सर्वच पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. चौकसभा, जाहीर सभा, पदयात्रा आणि घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर नेत्यांचा भर दिसून येत आहे. या प्रचाराच्या धामधुमीत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे या पश्चिम उपनगरात सक्रिय झाल्या असून त्यांनी आज मुंबईतील विविध भागांचा दौरा केला.
अदिती तटकरे आज मुंबई पश्चिम उपनगरातील प्रभाग क्रमांक 83 मध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रचारादरम्यान त्यांनी चौकसभेला संबोधित करत सांगितले की, त्यांच्या पक्षाचा उमेदवार हा केवळ निवडणुकीपुरता नव्हे, तर कायमस्वरूपी स्थानिक प्रश्नांसाठी काम करणारा आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिला व बालकल्याणाशी संबंधित प्रश्न याबाबत उमेदवार जनतेसमोर ठोस भूमिका मांडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी माध्यमांशी बोलताना अदिती तटकरे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेवरही सविस्तर भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, “लाडकी बहीण योजना ही निवडणुकीसाठी जाहीर केलेली नाही, तर महिलांच्या प्रत्यक्ष लाभासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.” या योजनेमुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल होत असून आर्थिकदृष्ट्या त्यांना आधार मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या योजनेचे श्रेय कोण घेतो, यापेक्षा महिलांना प्रत्यक्षात किती लाभ मिळतो, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे अदिती तटकरे यांनी ठामपणे सांगितले. “योजनेचा उद्देश जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा आहे. किती महिला लाभार्थी आहेत, त्यांना वेळेवर मदत मिळते का, आणि त्यांच्या दैनंदिन गरजांमध्ये ही योजना उपयुक्त ठरते का, हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे,” असे त्या म्हणाल्या. प्रचारादरम्यान महिलांची आणि स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली. महिलांमध्ये अदिती तटकरे यांच्या उपस्थितीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महिला मतदार निर्णायक भूमिका बजावणार असल्याने, महिला व बालविकास मंत्र्यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.