राज्यातील महापालिका निवडणुकांचा प्रचार जोर धरू लागला असतानाच राजकीय आघाड्या आणि युतींमध्ये जागावाटपाचा पेच अधिकच तीव्र होताना दिसत आहे. भाजप अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे, तर काही ठिकाणी आघाडी आणि युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रयोग करत आहे. मात्र, बहुतांश महापालिकांमध्ये जागावाटपावर एकमत होत नसल्याने महायुतीतील घटक पक्षांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतही सर्वच पक्ष आपापली भूमिका ठामपणे मांडत असल्याने एकमेकांविरोधात सूर लागल्याचे चित्र आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होऊन तीन दिवस उलटले असले, तरी अद्यापही आघाडी आणि युतीमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. जागावाटपावरून पक्षांत रुसवे-फुगवे सुरू असून अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवार संभ्रमात सापडले आहेत. याचा थेट परिणाम मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरही होत असल्याचे दिसून येत आहे. आर्थिक राजधानीत भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये सुमारे 200 जागांवर एकमत झाले असून उर्वरित 27 जागांसाठी जोरदार चर्चा सुरू आहेत. या जागांसाठी दोन्ही पक्ष आग्रही असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठका सुरू आहेत.
मुंबईसोबतच ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांमध्येही जागावाटपावर खलबते सुरू आहेत. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला युतीत सामावून घेण्यावरून भाजप आणि शिंदे सेनेत मतभेद असल्याचे समोर येत आहे. नबाब मलिक राष्ट्रवादीकडून सूत्रे हाती घेत असल्यास ही युती नकोच, असा सूर विशेषतः भाजपकडून लावला जात असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा न मिळाल्यास पुणे-पिंपरीप्रमाणेच मुंबईतही अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही भाजप-शिवसेना युतीचा पेच कायम असून आतापर्यंत पाच बैठका निष्फळ ठरल्या आहेत. आज पुन्हा मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
दरम्यान, पुण्यात महायुतीतही जागावाटपावरून तणाव आहे. शिंदे सेनेने 35 जागांवर ठाम राहण्याचा निर्धार केला असून त्यापेक्षा कमी जागांवर तडजोड न करण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. भाजपने मात्र 125 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवल्याने दोन्ही पक्षांतील पेच कायम आहे. याशिवाय मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीतील जागावाटपावरही अद्याप तोडगा निघालेला नाही. वंचितने 43 जागांची मागणी केली असून काँग्रेसकडून मर्यादित जागांचा प्रस्ताव असल्याने चर्चा निर्णायक टप्प्यावर आहे. एकूणच महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांसमोर जागावाटपाचं आव्हान अधिक गडद झालं आहे.