सेंसेक्स गुरुवारी तब्बल 400 अंकांनी उसळला असून तो आपल्या सर्वकालीन उच्चांक 85,978 अंकांपासून केवळ 5 टक्क्यांवर आला आहे. निफ्टीदेखील 26,277 या उच्चांकापासून 5 टक्क्यांवर ट्रेड होत आहे. बाजार चढण्यामागे प्रमुख कारणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केलेल्या पुढील पिढीच्या जीएसटी सुधारणा जाहीरातीचा समावेश आहे. यामुळे कर रचना सुलभ होणार, रोजच्या वस्तू स्वस्त होणार आणि खप वाढणार अशी अपेक्षा आहे. तसेच एस अँड पी ग्लोबलने 14 ऑगस्टला भारताची क्रेडिट रेटिंग BBB- वरून BBB केली असून यामुळे परदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे.
याशिवाय रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतांनी गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये अमेरिकन फेड व्याजदर कपात करू शकते, अशी अपेक्षा आहे. कंपन्यांचे निकाल सुधारतील अशीही शक्यता असल्याने बाजाराला बळ मिळत आहे.
मात्र काही धोके अद्याप कायम आहेत. 27 ऑगस्टपासून अमेरिका भारताच्या 50 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे. याचा भारतीय कंपन्या व बाजारावर मोठा परिणाम होऊ शकतो. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात 47,600 कोटी रुपयांचे शेअर्स विकले असून ऑगस्टमध्ये आतापर्यंत 25,000 कोटी काढले आहेत. त्याशिवाय बीएसई 500 कंपन्यांपैकी तब्बल 215 कंपन्यांचे शेअर्स 50 P/E पेक्षा जास्त दराने ट्रेड होत आहेत. विशेषत: स्मॉल कॅप शेअर्स महाग व जोखमीचे ठरत आहेत.
आगामी काळाबाबत तज्ज्ञांचा अंदाज वेगवेगळा आहे. रायटर्सच्या सर्वेनुसार या वर्षाअखेर निफ्टी 25,834 पर्यंत पोहोचू शकतो. 2026 च्या मध्यापर्यंत तो 26,500 व वर्षाअखेरीस 27,950 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र नवीन उच्चांक लगेच गाठणे अवघड असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे पंकज पांडे यांनी सांगितले की बाजार सध्या कन्सोलिडेशनच्या टप्प्यात आहे. दिवाळीपर्यंत नवीन उच्चांक होऊ शकतो. मात्र अमेरिकेसोबत व्यापार करार न झाल्याने निर्यात क्षेत्र अजूनही अस्थिर राहील.