महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रवासाला उजाळा देणाऱ्या ‘महाराष्ट्रधर्म’ या विशेष पॉडकास्ट मालिकेची सुरुवात आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर करण्यात आली. या मालिकेच्या पहिल्या पर्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक संदर्भांतून महाराष्ट्राच्या पायाभरणीपासून ते आजच्या वैचारिक उभारणीपर्यंतचा प्रवास उलगडून दाखवला. त्यांनी "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना इंग्रजी आक्रमणात थांबली अशी आपली परंपरा" असं देखील वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे.
पुढे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "महाराष्ट्राची सुरुवात देवांच्या पावलांनी झाली आहे. विदर्भ व नाशिकसारख्या भागांमध्ये रामायणकालीन साक्षीस्थळे आहेत, रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र लिहिलं तेही याच भूमीतून. कोकणातील घरांमध्ये अर्जुनाची तपश्चर्या, चिखलदऱ्यात सत्याचा विजय, अजिंठा लेण्यांमधील बुद्धांच्या विचारांचे चित्रण, ही महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण अध्यात्माची साक्ष आहेत." वारकरी संप्रदायाची गाथा, संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' द्वारे दिलेला गीतेचा सार, आणि पंढरपूरच्या विठ्ठल नामस्मरणाचा जयघोष यामुळे महाराष्ट्राचा आत्मा आजही जागृत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीचाही गौरव केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून धर्म आणि स्त्रियांचा सन्मान केला, संभाजी महाराजांनी विद्वत्तेने राजधर्म निभावला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात आणि शिक्षणासाठी क्रांतिकारी कार्य केले, लोकमान्य टिळकांनी स्वराज्यासाठी उभा लढा दिला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धीच्या बळावर अन्यायाविरुद्ध विजय मिळवला, असे त्यांनी स्पष्ट केले.
"हा महाराष्ट्र केवळ भूगोल नाही, तर विचारांचा प्रवाह आहे. त्या विचारांचा वसा पुढे नेणे ही आपल्या सर्वांची सार्वजनिक जबाबदारी आहे," असे त्यांनी या संवादाच्या शेवटी नमूद केले. 'महाराष्ट्रधर्म' ही पॉडकास्ट मालिका पुढील भागांमध्ये महाराष्ट्राच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत राज्याच्या वैचारिक वारशाला उजाळा देणार आहे.