डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 233 महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी अखेर शिथिल करण्यात आली. त्यामुळे 500 रुपयांच्या बाँडवर 'नॅक' मूल्यांकनाची हमी दिल्यानंतरच प्रवेशास परवानगी दिली जाणार आहे. राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने 'नॅक' (NAAC) मूल्यांकनासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने गुणवत्ता वाढीसाठी कठोर पावले उचलली असून 'नॅक' मूल्यांकन बंधनकारक केले होते. त्यानुसार, 17 मे रोजी 233 महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया थांबविण्यात आली होती, ज्यामुळे शिक्षण संस्थाचालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. या निर्णयावरून महाविद्यालयांकडून विद्यापीठ प्रशासनावर मोठा दबाव टाकण्यात आला, मात्र विद्यापीठ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर हा विषय उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला गेला. यावेळी महाविद्यालयांनी 'नॅक'चे संकेतस्थळ बंद असल्यामुळे मूल्यांकन करता न आल्याचे कारण पुढे केले. परिणामी, विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गदा येऊ शकते, हे लक्षात घेऊन मंत्र्यांनी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.
या अनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने प्रवेशबंदी हटवण्याचा निर्णय घेत बाँडवर हमी देण्याची अट घातली आहे. या निर्णयामुळे महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी सहा महिन्यांत 'नॅक' मूल्यांकन पूर्ण करणे त्यांना बंधनकारक असेल. हा निर्णय गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेकडे वाटचाल करणारा निर्णयक टप्पा ठरणार आहे, असे तज्ज्ञांचे मत असून, विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर निर्माण झालेले संकटही टळले आहे.