महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 2025 साठी जाहीर केलेल्या स्थानिक सुट्ट्यांमध्ये महत्त्वाचा बदल करत नवीन आदेश जारी केला आहे. नव्या शुद्धीपत्रकानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात आता नारळी पौर्णिमा (8 ऑगस्ट 2025) आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन (2 सप्टेंबर 2025) या दोन दिवसांना स्थानिक शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पूर्वी 16 ऑगस्ट रोजीच्या गोपाळकाला (दहीहंडी) आणि 6 सप्टेंबरच्या अनंत चतुर्दशीसाठी स्थानिक सुट्टी देण्यात आली होती. परंतु आता त्या दोन्ही दिवसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सदर निर्णय राज्यपालांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने घेतला असून, उप सचिव दिलीप देशपांडे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने आदेश जारी झाला आहे.
हा आदेश मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांवर लागू होणार आहे. 7 ऑगस्ट 2025 रोजी जारी केलेल्या या नव्या शासन आदेशाचा संकेतांक आहे. संपूर्ण आदेश महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.