राज्यात पुन्हा एकदा साथीच्या आजाराने डोकेवर काढले असून, यावेळी स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. एकूण रुग्णसंख्या 204 वर पोहोचली असून, सर्वाधिक रुग्ण मुंबईत 42, सोलापूर 36, पुणे 31, ठाणे 21, छत्रपती संभाजीनगर 19 आणि कोल्हापूरमध्ये 17 रुग्ण आढळले आहेत. या आजारामुळे राज्यातील नागपूर आणि नाशिकमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो आणि आता स्वाईन फ्लू यांसारख्या आजारांनी सार्वजनिक आरोग्य यंत्रणे समोरचे आव्हान वाढवलं आहे. प्रशासन सतर्क मोडमध्ये आहे आणि नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. कोरोना विषाणूनंतर आता स्वाईन फ्लूच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनासमोर दोन मोठ्या साथीच्या आजारांना रोखण्याचं दुहेरी आव्हान उभं ठाकलं आहे. दरम्यान, डॉक्टरांनी मास्कचा वापर, वैयक्तिक स्वच्छता आणि लक्षणं दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचं आवाहन केलं आहे.