ताज्या बातम्या

Arun Gawli : सर्वोच्च न्यायालयाकडून 'डॅडी'ला मिळाला दिलासा! अरुण गवळीला नगरसेवक हत्या प्रकरणात जामीन मंजूर

मुंबईतील कुख्यात डॉन आणि ‘डॅडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबईतील कुख्यात डॉन आणि ‘डॅडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, वयाचा विचार करून आणि अपील प्रलंबित असल्याने न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने गवळीला जामीन मंजूर केला आहे.

गवळी गेल्या 17 वर्षांपासून कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याचे वय आता 76 वर्षे झाले असून, या परिस्थितीचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला. तरीदेखील गवळीविरुद्धची जन्मठेप शिक्षा कायम आहे आणि या शिक्षेविरोधात केलेले अपील न्यायालयात प्रलंबित आहे.

अरुण गवळी आणि त्याच्या टोळीवर खंडणी, अपहरण, आर्थिक लाभासाठी धमक्या देणे तसेच मुंबई, ठाणे आणि कल्याणमधील अनेक मालमत्ता हडप करण्याचे आरोप आहेत. या गुन्ह्यांमुळे गवळीच्या टोळीविरोधात अनेक वेळा गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

लालबाग, परळ, भायखळा, करीरोड, दगडी चाळ, सातरस्ता, माजगाव या भागांमध्ये गवळीचा मोठा दबदबा आहे. त्याला ‘डॅडी’ म्हणून ओळखले जाते. सन 2004 मध्ये गवळीने दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शिवसेनेचे मोहन रावले आणि राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर त्यावेळी उमेदवार होते. गवळीला या निवडणुकीत तब्बल 92 हजार मते मिळाली होती.

सन 2007 मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या भागातील प्रॉपर्टी वादातून ही हत्या घडली. सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीशी जामसंडेकर यांचा वाद सुरु होता. त्यानंतर सदाशिवने गवळीच्या हस्तकांना सुपारी दिली. गवळीच्या आदेशानुसार प्रताप गोडसेने श्रीकृष्ण गुरवमार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी या शुटर्सची निवड केली. दोघांना अडीच लाख रुपये देण्याचे ठरले आणि ॲडव्हान्स म्हणून प्रत्येकी 20 हजार रुपये दिले.

विजयकुमार गिरीने अशोककुमार जयस्वालच्या मदतीने जवळपास 15 दिवस जामसंडेकरवर पाळत ठेवली. अखेरीस 2 मार्च 2007 रोजी संधी मिळताच त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ‘डॅडी’ म्हणून ओळखला जाणारा अरुण गवळी 17 वर्षांनंतर तुरुंगाबाहेर आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Patil In Mumbai : मनोज जरांगेंचा ताफा मुंबईच्या वेशीवर, कार्यकर्ते आझाद मैदानावर...

Latest Marathi News Update live : इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी आज मुंबईत

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या प्रेमकहाणीला येणार नवीन वळण, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य