मुंबईच्या शिवतीर्थावर झालेल्या ठाकरे बंधूंच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात पेच टाकला आहे. उद्धव ठाकरे यांनी अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची बातमी बाहेर आल्यानंतर या भेटीमागील कारणांवर तर्क–वितर्कांचा बाजार रंगला आहे. ही भेट अचानक नव्हे, तर पूर्वनियोजित असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले असून आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत आणि अनिल परब उपस्थित होते, यावरूनच ही भेट केवळ कौटुंबिक मर्यादेत राहिली नसून ठळकपणे राजकीय हेतू साधणारी होती, हे अधोरेखित झाले.
पाहूयात काय आहे या भेटी मागची कारणे...
1. महापालिका निवडणुकांचा फोकस
मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजप–शिंदे गटाला रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची संभाव्य युती घडवून आणण्याचा प्रयत्न या भेटीतून सुरू झाला आहे, असे बोलले जात आहे. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेची साथ उद्धव ठाकरेंना निर्णायक बळ देऊ शकते.
2. उद्धव ठाकरेंना संघटनात्मक बळकटी
पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला राजकीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी राज ठाकरे यांची ताकद सोबत आल्यास ठाकरे ब्रँड अधिक परिणामकारक ठरू शकतो. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढेल आणि भाजप–शिंदे गटाला एकत्रितपणे तोंड देता येईल.
3. दसरा मेळाव्याचे आमंत्रण
उद्धव ठाकरे यांनी या भेटीदरम्यान मनसे अध्यक्षांना दसरा मेळाव्यासाठी औपचारिक आमंत्रण दिल्याची चर्चा आहे. यामुळे शिवसेना–मनसे कार्यकर्त्यांच्या पातळीवर एकत्रित संदेश जाऊ शकतो. मराठी मतांचे विभाजन रोखण्यासाठी हा प्रयत्न महत्त्वाचा मानला जात आहे.
4. भाजप–शिंदे गटाला शह
राज्यात सध्या भाजप–शिंदे गटाची आघाडी मजबूत स्थितीत आहे. ठाकरे बंधूंची संभाव्य एकजूट या सत्तारूढ आघाडीला धक्का देणारी ठरू शकते. विरोधी पक्षांचे एकत्रीकरण हे सध्याच्या राजकीय समीकरणांना बदल घडवून आणणारे ठरू शकते.
5. वैयक्तिक नातेसंबंधांना राजकीय रंग
गेल्या काही वर्षांतील राजकीय मतभेदांमुळे दोघांमध्ये अंतर आले होते. परंतु अलीकडच्या कौटुंबिक भेटींनंतर वैयक्तिक संबंध पुन्हा उबदार झाले आहेत. आता या राजकीय बैठकीतून ते संबंध नव्या राजकीय समीकरणांना जन्म देण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाकरे कुटुंबीय ब्रँडची ताकद पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या हालचालीतून दिसून येतो.
या भेटीने महाराष्ट्रातील राजकारणाला नवे वळण दिले आहे. शिवसेना–मनसे युतीची शक्यता जरी अद्याप अनिश्चित असली, तरी ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची इच्छा स्पष्ट होत आहे. भाजप–शिंदे गटाविरुद्धचा लढा अधिक परिणामकारक करण्यासाठी या भेटीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. येत्या काही दिवसांत या घडामोडींना कोणते राजकीय रूप प्राप्त होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.