यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात महाराष्ट्राचा चित्ररथ देशभराचे लक्ष वेधून घेणार आहे. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच, कर्तव्य पथावर होणाऱ्या भव्य परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची थिम ‘गणेशोत्सव’ असणार आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचे प्रतीक असलेला गणेशोत्सव या चित्ररथातून साकारला जाणार असून, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा, सामाजिक एकोपा, लोककला आणि भक्तीभाव यांचे सुंदर दर्शन घडवले जाणार आहे. या चित्ररथात महाराष्ट्राची लोकसंस्कृती, ढोल-ताशांचा गजर, वारसा, शिल्पकला आणि आधुनिकतेचा संगम दाखवण्यात येणार असून, संपूर्ण देशाला महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेची ओळख करून दिली जाणार आहे.
गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर राजधानीत होणाऱ्या या राष्ट्रीय मंचावर महाराष्ट्राची ही उपस्थिती ऐतिहासिक मानली जात आहे. यामुळे ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष थेट कर्तव्य पथावर घुमणार असल्याची भावना राज्यभरात व्यक्त होत आहे. यंदाचा चित्ररथ हा केवळ एक झलक नसून, महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि एकात्मतेचा अभिमानास्पद उत्सव ठरणार आहे.