नागपूर शहरातील पारडी शिवनगर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या बिबट्याला आज सकाळी थरारक रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. या बिबट्याने पहाटेच्या वेळी केलेल्या हल्ल्यात चार नागरिक जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी कापसी भागामध्ये बिबट्या दिसल्याची माहिती होती, पण तो सापडला नाही.
आज पहाटे ५.३० ते ६.०० वाजताच्या दरम्यान हाच बिबट्या थेट शिवनगर भागातील दाट लोकवस्तीत शिरला. त्याने परिसरातील चार निरपराध नागरिकांना जखमी केले. त्यानंतर हा बिबट्या स्वतःला लपवण्यासाठी वर्मा कुटुंबियांच्या घरामध्ये शिरला. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. तसेच नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे रेस्क्यू पथक, वैद्यकीय तज्ञ आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच बिबट्याला सुरक्षित पकडता यावे यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बिबट्याला पाहण्यासाठी आलेल्या बघणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी नियंत्रणात आणणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते, कारण गर्दीमुळे होणाऱ्या आवाजाने बिबट्या बिथरण्याची आणि रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळा येण्याची शक्यता होती.
वन विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ऑपरेशन बिबट्या सुरू केले. यावेळी सर्वप्रथम बिबट्या ज्या पांढऱ्या घरात लपला होता, त्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लगेच जाळी लावण्यात आली. बिबट्याला निसटण्याची संधी मिळू नये यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल होते. यानंतर रेस्क्यू टीमने वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी लागणारे डार्ट आणि विशेष बंदुकीची तयारी केली. अत्यंत काळजीपूर्वक आणि बिबट्याच्या हालचालीचा अंदाज घेऊन तज्ञांनी समोरील गच्चीवरुन बिबट्यावर यशस्वीरित्या डार्ट फायर केला.
हा डार्ट लागताच बिबट्या कळवला. त्याने स्वत:च्या बचावासाठी गच्चीवरुन चढून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. त्या डार्टमध्ये असलेल्या औषधाच्या प्रभावाने बिबट्या काही वेळातच शांत झाला. तो बेशुद्ध झाला. बिबट्या पूर्णपणे बेशुद्ध झाल्यानंतर वन विभागाच्या एका कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर मोठी जाळी टाकली. त्यानंतर एक चादर टाकत त्याला गुंडाळून सुरक्षितपणे रेस्क्यू व्हॅन मध्ये हलवण्यात आले. या संपूर्ण बचाव कार्यादरम्यान, स्थानिक नागरिकांनी वन विभागाच्या पथकाला उशिरा मदत मिळाल्याने संताप व्यक्त केला होता, परंतु अखेरीस बिबट्याला सुरक्षित पकडल्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले. सध्या पकडलेल्या बिबट्याला पुढील वैद्यकीय तपासणी आणि निगा राखण्यासाठी सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील परमात्मा आश्रम परिसरात गोठ्यात बांधलेल्या दोन जनावरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मौदा परिसरातही भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी वन विभागाने बिबट्याच्या वावराचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.