माध्यमांच्या आजच्या जडणघडणीचा अविभाज्य घटक असलेल्या आणि या वर्षी विशेष प्रभावशाली ठरलेल्या कला, सामाजिक, राजकारण अशा विविध विभागांमध्ये आपला जोरदार ठसा उमटवणाऱ्या मान्यवर दिग्गज व्यक्तींच्या कार्याचा गौरव 'मीडिया एक्सलन्स ॲवॉर्ड 2025' देऊन करण्यात आला. 'माई मीडिया 24' प्रस्तुत मीडिया असोशिएशन ऑफ इंडियाच्या वतीने व प्लॅनेट मराठी अक्षय बर्दापूरकर यांच्या सहकार्याने पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना साहित्य क्षेत्रातील-ऐतिहासिक कार्यासाठी मीडिया एक्सलन्स 2025 ॲवॉर्डने गौरविण्यात आले. यावेळी 'माई मीडिया 24' च्या कार्याचं कौतुक करताना व्रतासारखं सातत्याने हे काम करत राहणं हे खरचं अभिनंदनीय असल्याचं त्यांनी याप्रसंगी सांगितलं. 'माई मीडिया 24' च्या यापुढील सर्व उपक्रमांना शुभेच्छा देताना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याप्रसंगी दिले.
थँलसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या साथ संस्थेच्या सुजाता रायकर यांनी माई मीडियाचे आभार व्यक्त करुन थँलसेमियाविरोधात ही लढाई सर्व सहभागातून यशस्वी करू शकू, महाराष्ट्र सरकारने आम्ही माई मीडियाच्या माध्यमातून निवेदन देत आहोत. सूचना व नियंत्रण सूचना देत आहोत. त्याची अंमलबजावणी सरकारी पातळीवर केली तर मोठं काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
"या पहिल्यावहिल्या पत्रकार पुरस्कार सोहळ्यात माझ्या कामाची दखल घेतली, याचा आनंद असून यापुढेही माझ्या या पत्रकार मित्रांसाठी चांगलं काम करीन", असं आश्वासन अभिनेते विजय पाटकर यांनी यावेळी दिलं. अभिनेते जयवंत वाडकर, दिपक करंजीकर यांनीही या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या पुरस्कार सोहळ्याच्या समन्वयक, प्रो. 'माई मीडिया 24' व मीडिया असोशिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल हरीष करदेकर यांनी यावेळी सांगितले की, "आज माध्यमांचे स्वरूप बदलत चालले आहे. अशावेळी इतर काय करतात यापेक्षा आपण काय वेगळं करू शकतो या विचारातून मी हा पुरस्कार सोहळा करण्याचे ठरवले. या पत्रकारितेच्या वाटचालीत मला अनेक चांगले स्नेही मिळा.ले त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. अनेक जण खूप चांगली कामे करत असतात. अशा मान्यवरांचा सन्मान करायला मिळणं हे आमचं भाग्य आहे. समाजासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्याची संधी 'माई मीडिया 24' ला मिळाली, हा आमचा देखील गौरव आहे", अशा भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या. रविराज इळवे, कामगार कल्याण कार्य - महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त म्हणाले की, "मंडळाच्या इतिहासात प्रथमच माझा म्हणजे आमच्या मंडळाच्या कार्याचा गौरव झाला. हा ऐतिहासिक पुरस्कार आहे. आणखी जास्त काम करण्याची ऊर्जा मिळाली "
"चांगल्या कार्यक्रमाचा भाग होता आल्याचा आनंद व्यक्त करताना अशा पुरस्कारांनी शाबासकीची जी थाप आपल्या पाठीवर पडते ती अजून चांगले काम करण्यासाठी खूप प्रेरणादायी ठरते", अशी भावना सर्व सन्मानित मान्यवरांनी यावेळी बोलून दाखविली. एकापेक्षा एक बहारदार लोककलाविष्कार आणि त्याला मिळणारी उपस्थितांची उत्स्फूर्त दाद यामुळे 'मीडिया एक्सलन्स ॲवॉर्ड 2025' नेत्रदीपक झाला.
पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे
विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना विधान परिषद शतक महोत्सवानिमित्त केलेले कार्य व साहित्य निर्मितीच्या ऐतिहासिक कार्यासाठी साहित्य क्षेत्रातील योगदान म्हणून, 'मीडिया एक्सलन्स ॲवॉर्ड 2025 ने तर पद्मश्री महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेते विजय पाटकर (माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ) या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.
नितीन केळकर यांना (पत्रकारिता जीवनगौरव), अनन्या गोयंका ( उडान ट्रस्टच्या शिक्षण क्षेत्र, सामाजिक कार्य), रविराज इळवे (कामगार कल्याण कार्य - महाराष्ट्र कामगार कल्याण, आयुक्त), सयाजी शिंदे (सामाजिक कार्य - सह्याद्री देवराई, निसर्ग संवर्धन), सुजाता रायकर (साथ संस्था, आरोग्य क्षेत्र - थॅलेसेमिया मुक्ती दूत), डॉ. प्रदीप ढवळ (साहित्य क्षेत्र - सांस्कृतिक योगदान), ॲड. संगिता चव्हाण (स्त्री सक्षमीकरण - सामाजिक कार्यकर्त्या), संतोष पवार (सांस्कृतिक क्षेत्र - लोककला संवर्धन), वैदेही परशुरामी (लक्षवेधी अभिनेत्री), किशोर आपटे (वरिष्ठ पत्रकार), मोहन बने (ज्येष्ठ छायाचित्रकार), श्रीकांत बोजेवार (ज्येष्ठ पत्रकार सल्लागार, महाराष्ट्र टाइम्स), संजीव भागवत (संशोधक पत्रकार, दै. सकाळ), विशाल पाटील (संपादक, लोकशाही मराठी वृत्तवाहिनी), प्रेरणा जंगम (पत्रकार सकाळ प्रीमियर), श्वेता वडके (वृत्तनिवेदिका, न्यूज 18 लोकमत) यांना सन्मानित करण्यात आले.
दिपक करंजीकर (कला, अर्थविश्लेषक), जयवंत वाडकर (कला), श्रुती राहुल (वृत्तनिवेदिका, Tv9 मराठी), अक्षय कुडकेलवार (रिपोर्टर, एनडीटीव्ही मराठी), श्रेयस सावंत (पत्रकार, पुढारी न्यूज), आनंद मुरुगकर (डिजिटल मार्केटिंग, लॉकिझ स्टुडिओ) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.