पिंपरी-चिंचवडच्या थेरगाव परिसरात मतदानाची माहिती देणाऱ्या कार्यकर्त्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. मतदारांना स्लिप देत असताना दोन वेगवेगळ्या ठिकाणी शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली.
पहिल्या प्रकारात राजेश वैद्य हे तरुण उमेदवारांच्या मतदान स्लिप वाटत असताना त्यांना प्रताप साहेबराव बारणे यांनी अर्वाच्य भाषा वापरून धमकावल्याचा आरोप आहे. दुसऱ्या घटनेत केदार राजू जगदाळे यांना जयदीप माने नावाच्या व्यक्तीने मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे.
या दोन्ही प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जयदीप माने याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असून निवडणुकीच्या काळात तो दहशत निर्माण करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.