राज्य मंत्रिमंडळात मोठा खांदेपालट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर कृषी खात्यापासून हटवण्यात येणार असून, त्यांची गच्छंती क्रीडामंत्री पदावर होणार असल्याचं समजते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यानुसार दत्तात्रेय भरणे यांची आता नव्या कृषिमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांच्या खातेबदलाची शिफारस करत मुख्यमंत्री फडणवीस यांना अधिकृत पत्र पाठवलं आहे. ही माहिती समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
रमी खेळतानाचा व्हिडिओ ठरला घातक?
गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे वादाच्या भोवऱ्यात होते. पावसाळी अधिवेशनाच्या काळात कोकाटे यांचा मोबाईलवर 'रमी' गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर विरोधकांनी जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विविध माध्यमांतून आणि विरोधी पक्षांकडून राज्यपालांपर्यंतही तक्रारी करण्यात आल्या होत्या.
या प्रकरणानंतर कोकाटेंच्या खातेबदलाची चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यांना थेट मंत्रिमंडळातून वगळण्याऐवजी दुसऱ्या खात्याची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा होती. हीच शक्यता आता सत्यात उतरत असल्याचे चित्र आहे.
दत्तात्रय भरणे नव्या कृषिमंत्रीपदी
दत्तात्रय भरणे यांच्याकडे यापूर्वी क्रीडामंत्रिपदाची जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे राज्याच्या कृषी विभागाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. कोकाटे यांची गच्छंती झाल्यानंतर ही जबाबदारी भरणे यांच्यावर येईल, अशी माहिती मिळते.
धनंजय मुंडेंची लॉबिंग निष्फळ?
दरम्यान, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पुन्हा एकदा कृषी खात्याची जबाबदारी मिळावी, यासाठी लॉबिंग सुरू असल्याची माहिती होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांचा मंत्रिमंडळातून राजीनामा घेतला गेला होता. मात्र पुन्हा मंत्रिमंडळात कमबॅक करण्यासाठी मुंडे प्रयत्नशील असल्याचं बोललं जात होतं. त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचंही समजत होतं. तरीही या खातेबदलात त्यांचं नाव कुठेच न आल्याने त्यांच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावर अंतिम निर्णय
कोकाटे यांची गच्छंती आणि भरणे यांची वर्णी यासंदर्भात अजित पवारांनी पाठवलेलं पत्र हा एक महत्त्वाचा टप्पा असला, तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतरच घेतला जाणार आहे. त्यामुळे अधिकृत घोषणेसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
या खातेबदलाच्या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाली वाढल्या आहेत. विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र सरकारने त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याऐवजी दुसरं खाते देत तडजोडीचा मार्ग स्वीकारल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा