महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत राजकीय घडामोडींवर परखड भूमिका मांडली. शिवसेनेकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर न करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “उद्या कोणाला उमेदवारी मिळाली आहे ते कळेल. याद्या जाहीर करायचे प्रकार आता थांबवले आहेत. काल संध्याकाळपर्यंत ज्यांना शिवसेनेने अर्ज दिले, त्यांनी अर्ज भरले आहेत,” असे राऊत यांनी सांगितले.
मनसेच्या उमेदवारांनीही अर्ज दाखल केल्याचे त्यांनी नमूद केले. काही ठिकाणी मनसे आणि शिवसेना दोन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरल्याचे चित्र आहे. “नाशिकपासून संभाजीनगरपर्यंत जे काही राजकीय गोंधळ सुरू आहे, तो पाहण्यासारखा आहे,” अशी टीका त्यांनी केली. भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना संजय राऊत म्हणाले, “भाजपाकडे गुंडांची रीघ लागली आहे. पाच कोटींसाठी रीघ लागली आहे. आज निष्ठावंत कोणीच उरलेले नाही.” शिंदे गट आणि भाजप आर्थिक पॅकेज देऊन लोकांना फोडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “आज निष्ठा त्या पावसात वाहून गेली आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
शिवसेनेतील तथाकथित बंडखोरांवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “यांना बंडखोर म्हणू नये. इंग्रजांविरोधात जे बंड झाले ते खरे बंड होते. हे लोक बेईमान आहेत. जर एखादा उमेदवार दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी घेतो, तर तो गेल्या दहा दिवसांपासून त्या पक्षाच्या संपर्कात असतो.” मातोश्रीकडून उमेदवारी देताना कोणालाही खास आवाहन करण्यात आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “मेरिटवर उमेदवारी दिली आहे. प्रत्येक वॉर्डात अनेक इच्छुक असतात. त्यामुळे अन्यायाचा प्रश्नच येत नाही,” असे त्यांनी सांगितले.
मनसे-शिवसेना युतीबाबत राऊत म्हणाले की ही युती भक्कम आहे. “राज ठाकरे काल मातोश्रीवर आले होते. संयुक्त सभा, शिवतीर्थावरील सभा, नाशिक-ठाणे-डोंबिवली येथे कार्यक्रम आणि जाहीरनाम्याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. भाजपच्या स्टार प्रचारकांवर टीका करताना राऊत म्हणाले, “बीएमसीसाठी राष्ट्रपतींनाही आणतील, याचे आश्चर्य वाटणार नाही. निवडणूक आयोगाने नावाला जागावे आणि लांडग्यांना आवर घालावा,” असा इशाराही त्यांनी दिला.