आम्ही एवढं घाबरलोय की झोपच लागत नाही, असा टोला भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांचा मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय एकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा गती घेताना दिसत आहे. मात्र या संभाव्य एकीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी सडेतोड प्रतिक्रिया देत जोरदार खिल्ली उडवली आहे.
नितेश राणे म्हणाले, "महाराष्ट्राच्या जनतेने 2024 ला एका पक्षाला 20 आमदार दिले आणि दुसऱ्याला शून्य. त्यांच्याकडे भरपूर ताकद आहे. आम्ही एवढे घाबरलोय की झोप लागत नाहीये! आमचं काय होणार, असा विचार करत आमच्या जिल्हाध्यक्षांना, मलाही घाम येतो आहे!"
पुढे ते टोला लगावत म्हणाले की, "एकाकडे 20 आमदार आहेत, दुसऱ्याकडे शून्य. बाप रे! आणि आमच्याकडे 132 आमदार आहेत. तरी आम्ही घाबरतोय! काय तुलना करायची आमची आणि त्यांची?" तसेच, राणे यांनी 'ठाकरे ब्रँड हिंदुत्व' यावरही भाष्य करत टीका केली. "हिंदुत्व सोडलं आणि ठाकरे ब्रँड संपलं... हे वास्तव आहे. आता लोकांच्या भावना वेगळ्या आहेत. खऱ्या हिंदुत्वावर विश्वास असणाऱ्या पक्षालाच जनता पाठिशी घालणार आहे."
नितेश राणे यांच्या वक्तव्यातून भाजपने मनसे-शिवसेना (उद्धव गट) युतीकडे फारसं गांभीर्याने न पाहिल्याचं स्पष्ट होते. एकीकडे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असताना, दुसरीकडे भाजप मात्र याला हास्यस्पद आणि भविष्याला धोका नसलेली युती असे संबोधत आहे.