वाघोली परिसरात दररोजच्या वाहतूक कोंडीसह अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पुणे-नगर महामार्गावर सर्रास अवजड वाहने धावत असून, पुणे शहर वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या वेळेचे हे मोठे उल्लंघन मानले जात आहे. यामुळेच या मार्गाने प्रवास करणाऱ्यांचा जीव धोक्यात आला असून, अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.
वाहतूक विभागाने काही महिन्यांपूर्वी शहरात अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घातले होते. सहा ते दहा चाकी वाहनांना फक्त रात्री 11 ते पहाटे 6 या वेळेतच प्रवेशाची परवानगी आहे. तरीही हे वाहनधारक वेळेचे बंधन न पाळता बिनधास्तपणे वाहतूक करत आहेत. अनेक वाहने क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करीत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
वाहतूक पोलिसांकडून काही प्रमाणात कारवाई केली जात असली, तरी परिवहन विभाग याबाबत उदासीन असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय लिंगाडे यांनी सांगितले की, अवजड वाहनांवर वेळेच्या उल्लंघनासाठी लवकरच कडक कारवाई करण्यात येईल. नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून, ही कारवाई सातत्याने राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.