जुई जाधव, मुंबई
जगभरात कोरोनाचा प्रसार सुरु झाला आहे. यामुळे पुन्हा कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले जात आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यात दिलेल्या लक्षाप्रमाणे दोन्ही डोस १०० टक्के देण्यात आले. मात्र मुंबईकरांनी बूस्टर डोस कडे पाठ फिरवली आहे. पालिकेकडे सध्या कोव्हॅक्सीन या लसीचे डोस आहेत. कोव्हीशील्ड आणि कोर्बोवॅक्स या लसीचा साठाच नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. यामुळे लसीकरणाचा बाबत पालिकेच्या आरोग्य विभागापुढे मोठे आव्हान असणार आहे.
देशभरात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. मुंबईत २०११ च्या जनसंख्येच्या नोंदी प्रमाणे १ कोटी ३० लाख नागरिक आहेत. त्यामधील ९४ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट सरकाराने पालिकेला दिले होते. पालिकेने १ कोटी ८ लाख ८९ हजार ७२१ नागरिकांना लसीचा पहिला, ९८ लाख ८ हजार ७४८ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम कमी करण्यासाठी बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुंबईमध्ये केवळ १४ लाख ४८ हजार ७८५ नागरिकांना लसीचा बूस्टर डोस देण्यात आला आहे
८३ लाख नागरिक बूस्टर डोसपासून वंचित -
मुंबईमध्ये लसीचा पहिला आणि दोन्ही डोस घेण्यासाठी नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला. मात्र बूस्टर डोसला नागरिकांनी प्रतिसाद दिलेला नाही. मुंबईमध्ये ९८ लाख ८ हजार ७४८ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. त्यापैकी केवळ १४ लाख ४८ हजार ७८५ नागरिकांना लसीचा बूस्टर डोस देण्यात आला आहे. अद्यापही ८३ लाख ५९ हजार ९६३ नागरिक बूस्टर डोसपासून लसीपासून वंचित आहेत.
मुंबईत लस नाही -
मुंबईमध्ये कोव्हीशील्ड, कोवॅक्सीन आणि कोर्बोवॅक्स या लस देण्यात आल्या. मुंबईमध्ये सध्या कोवॅक्सीन या लसीचे केवळ ६ हजार डोस बाकी आहेत. कोव्हीशील्ड आणि कोर्बोवॅक्स या लसीचा एकही डोस शिल्लक नाही. मुंबईत सध्या ४० ठिकाणी लसीकरण सुरु आहे. त्यातील ३६ पालिकेची आणि ४ राज्य सरकारची केंद्र आहेत.