थोडक्यात
भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे.
यामुळे सेन्सेक्सने तब्बल 500 अंकाची उसळी घेतली.
निफ्टी 52 निर्देशांकाने दिवसात 25,000 चा टप्पा गाठला.
भारतीय शेअर बाजारात बुधवारी (10 सप्टेंबर 2025) जोरदार तेजी पाहायला मिळाली. सकाळपासूनच बाजारात खरेदीचा जोर दिसून आला आणि त्यामुळे सेन्सेक्सने तब्बल 500 अंकांची उसळी घेतली. तर निफ्टी 52 निर्देशांकाने दिवसात 25,000 चा टप्पा गाठला. शेवटी सेन्सेक्स 323.83 अंकांनी वाढून 81,425.15 वर बंद झाला, तर निफ्टी 104.50 अंकांची वाढ नोंदवत 24,973.10 वर स्थिरावला.
या तेजीमागे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी कराराची वाढती शक्यता हे महत्त्वाचे कारण ठरले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत व्यापारी करारासाठी कोणत्याही अडचणी नाहीत, लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा होणार असल्याचे स्पष्ट केले. मोदींनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने गुंतवणूकदारांमध्ये आशावाद निर्माण झाला. याचाच परिणाम बाजाराच्या कामगिरीवर दिसून आला.
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संकेत मिळाले. आशियाई शेअर बाजारात जपानचा निक्केई, दक्षिण कोरियाचा कोस्पी, चीनचा शांघाय कंपोजिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे निर्देशांक तेजीमध्ये राहिले. याचा फायदा भारतीय बाजाराला झाला. विदेशी गुंतवणूकदारांनीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली. 9 सप्टेंबर रोजी त्यांनी भारतीय बाजारात तब्बल 2,000 कोटी रुपयांची खरेदी केली. सप्टेंबर महिन्यातील ही पहिली मोठी गुंतवणूक होती. यामुळे बाजाराला आणखी आधार मिळाला.
आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्येही सलग दुसऱ्या दिवशी जोरदार वाढ झाली. अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी आयटी कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी केली. ऑरकेल फायनान्शिअल सर्व्हिसेस, परसिस्टेंट सिस्टीम्स, एमफॅसिस, कोफोर्ज आणि विप्रोच्या शेअर्समध्ये तब्बल ९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. निफ्टी आयटी निर्देशांक 2.5 टक्क्यांनी वर गेला.
याशिवाय रुपयामध्येही सुधारणा झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी मजबूत होत 88.10 वर पोहोचला. डॉलर कमजोर होणे आणि विदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली खरेदी या घटकांमुळे रुपयाला आधार मिळाला. एकूणच, भारत-अमेरिका व्यापारी कराराबाबत सकारात्मक घडामोडी, जागतिक बाजारातील मजबुती, विदेशी गुंतवणूकदारांची खरेदी आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समधील तेजी यामुळे बुधवारी भारतीय शेअर बाजाराने दमदार कामगिरी केली.