नववर्षात वित्तीय नियम बदल होणार आहेत. यूपीआय, क्रेडिट कार्ड, मुदतठेवी, आयकराबाबत हे बदल होणार आहेत. याबाबत वेळीच नियोजन न केल्यास तुमची पंचाईत होऊ शकते, प्रसंगी आर्थिक नुकसानही होऊ शकते. नेमके काय बदल होणार आहेत जाणून घेऊया.
आयकरविषयक नियम
TAX २०२४ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने घोषित केलेले अनेक बदल वित्त वर्ष २०२४-२५ मध्ये लागू केले जाणार आहेत. या बदलांमुळे कर कपात आणि कर सवलतींत बदल होणार आहेत. जुलै २०२५ मध्ये भरावयाच्या आयकर विवरणपत्रात यातील अनेक सवलतींचा दावा दाखल करता येऊ शकेल.
यूपीआय १२३ पे मर्यादा
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) 'यूपीआय १२३ पे'ची प्रतिव्यवहार हस्तांतरण मर्यादा ५ हजार रुपयांवरून वाढवून १० हजार रुपये केली आहे. १ जानेवारीपासून याची अंमलबजावणी सुरू होईल. युपीआय वापरणाऱ्या हजारो ग्राहकांना त्याचा फायदा होईल.
रुपे कार्डधारकांना एअरपोर्टवर लाउंजचा लाभ
रुपे क्रेडिटधारकांना १ जानेवारीपासून विमानतळावरील लाउंजचा मोफत वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या सवलतीच्या लाभासाठी रुपे कार्डावरील खर्चाचे काही निकष लागू आहेत. या निर्णयामुळे सतत देशांतर्गत तसेच देशाबाहेर विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांना लाभ होणार आहे.
एनबीएफसींच्या मुदतठेवी
गृहवित्त आणि बिगर बँकिग वित्तीय संस्थांच्या (एनबीएफसी) मुदत ठेवींसाठी नवे नियम आजपासून लागू करण्यात आले आहेत. यात मुदतठेवी मुदतीपूर्वी मोडणे, ठेवींसाठी दिले जाणारे नामांकन आणि सार्वजनिक ठेवी परत करणे यांसंबंधीच्या नियमांचा यात समावेश आहे.
ईपीएफचे पैसे एटीएममधून
ATM कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) सदस्यांना थेट एटीएमद्वारे पैसे काढण्याची सुविधा मिळेलणार आहे. श्रम सचिव सुमिता दावरा यांनी ही घोषणा याआधीच केलेली आहे. त्यासाठी सध्या गरजेची असलेली तांत्रिक व्यवस्था उभी केली जात आहे. मे-जून २०२५ पर्यंत ही सुविधा सुरू होऊ शकेल.
या फोनवर व्हॉट्सअॅप बंद
१ जानेवारीपासून अँड्रॉइड स्मार्टफोन तसेच किटकॅट ओएससाठी अपडेट व बिग फिक्स सिक्युरिटी पॅच पाठवणे बंद होईल. त्यामुळे जवळपास २० फोनवर व्हॉट्सअॅप चालणार नाही. केवळ अँड्रॉइड ५.० आणि येणारे नवे अँड्रॉइड फोन तसेच आयओएस १२ आणि आगामी नवे आयफोन यांनाच अपडेट मिळतील.