गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला म्हणजेच गणपती विसर्जनाच्या दिवशी होते. भक्तिभावाने घरात आणलेले बाप्पा विसर्जनासाठी निघतात आणि "गणपती बाप्पा मोरया, पुन्हा वर्षी लवकर या" अशा गजरात साऱ्या वातावरणातच एक भावुक क्षण रंगतो. यंदा 6 सप्टेंबर 2025, शनिवार या दिवशी अनंत चतुर्दशी आणि विसर्जनाचा दिवस एकत्र आला आहे. विशेष म्हणजे यंदा शनिवारी अनंत चतुर्दशी असल्याने धार्मिक दृष्ट्या अनेक दुर्मिळ संयोग जुळले आहेत.
याच पार्श्वभूमीवर शास्त्रांमध्ये सांगितलेल्या काही आहार नियमांचे पालन करणे अत्यावश्यक मानले जाते. कारण, पुराणानुसार विसर्जनाच्या दिवशी काही पांढऱ्या रंगाच्या पदार्थांचं सेवन वर्ज्य आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास पुढील 14 वर्षांपर्यंत दुःख आणि संकटांचा सामना करावा लागू शकतो, अशी धारणा आहे.
कोणते पदार्थ वर्ज्य?
१. दही
अनंत चतुर्दशीच्या दिवशी दह्याचं सेवन टाळावं. अग्निपुराणात उल्लेख आहे की, या दिवशी दही खाल्ल्यास उपवास आणि पूजेचं पुण्य फळ लाभत नाही. त्यामुळे दह्याचा वापर विसर्जनाच्या दिवशी करू नये.
२. मीठ
या दिवशी मीठ खाल्ल्यास कुटुंबात नकारात्मक ऊर्जा वाढते, अशी मान्यता आहे. शास्त्रांनुसार, अनंत चतुर्दशीच्या दिवशी मीठाचं सेवन केल्यास घरातील आनंद कमी होतो आणि पुढील १४ वर्षे हालअपेष्टा भोगाव्या लागतात.
३. तांदूळ
भात हा रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग असला तरी अनंत चतुर्दशीला तांदळाचं सेवन टाळलं जातं. या दिवशी भात खाल्ल्यास उपवासाचं पुण्य नष्ट होतं आणि धार्मिक दृष्ट्या पूजेचं फल कमी होतं, अशी मान्यता आहे.
का टाळतात पांढरे पदार्थ?
धर्मशास्त्रानुसार, पांढरा रंग हा चंद्र आणि शीतल ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. पण अनंत चतुर्दशीचा संबंध तप, संयम आणि कठोर उपवास यांच्याशी आहे. पांढऱ्या पदार्थांचं सेवन केल्यास उपवासाची पवित्रता कमी होते आणि संचित पुण्य लाभत नाही, असं मानलं जातं.