राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरवरून राजकारण तापलं आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या धक्कादायक विधानामुळे भारतीय सैन्याचा अपमान होत असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा पूर्ण पराभव झाला होता. त्यांनी हवाई युद्ध आणि क्षेपणास्त्र युद्धावरून सैनिकांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत, १२ लाख सैनिकांचा उपयोग खरोखरच आवश्यक आहे का, असा सवाल केला. चव्हाणांचे हे वक्तव्य काँग्रेसकडून देशद्रोहाचे संकेत देत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाणांवर निशाणा साधला आणि म्हटले की, "पाकिस्तानची बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्थानातील जनता माफ करणार नाही. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लष्करी जवानांनी उत्तर दिले, तरीही काँग्रेसकडून अशा प्रकारची विधाने केली जात आहेत. हे देशभक्ती नाही, तर पाकिस्तान प्रेम आहे. ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे हे नेते खऱ्या अर्थाने गद्दार आहेत." शिंदे म्हणाले की, लष्कराच्या कारवाईवर प्रश्न विचारणे म्हणजे जवानांचे मनोबल खच्चीकरण करणे आहे. त्यांनी लष्कराला सलाम केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. "रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. काँग्रेसने अशा प्रकारची विधाने केली; त्यांची कबर जनता खोदल्याशिवाय राहणार नाही," असा तीव्र टोला त्यांनी लगावला.
पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई दलाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत म्हटले, "७ मे रोजी अर्धा तास चाललेली हवाई लढाई आपण गमावली. भारतीय विमाने पाडण्यात आली, हवाई दल जमिनीवर ठेवण्यात आले, आणि एकही विमान उडाले नाही." राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून तापलेले असून, शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेसमध्ये टीकेचा जोरदार खुलासा झाल्याचे दिसत आहे.