महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचे राजकारण निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. महायुतीतील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज तिसऱ्या फेरीची महत्त्वाची बैठक होणार असून, ही बैठक मुक्तगिरी येथे पार पडणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज रात्री 8 वाजता शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असून, या बैठकीत उर्वरित जागांबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
150 जागांवर एकमत, 77 जागांवर अजूनही तिढा
महायुतीत आतापर्यंत 150 जागांवर एकमत झाले आहे, मात्र उरलेल्या 77 जागांवर अद्यापही एकमत होऊ शकलेले नाही. याच 77 जागांमुळे महायुतीतील चर्चांना वेग आला असून, आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, कोणत्या प्रभागात कोण उतरणार, यावर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीतील जागावाटपाचं गणित सुटतं का, की तिढा अधिक वाढतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. आजची मुक्तगिरी येथील बैठक महायुतीच्या भवितव्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार का? यावर पुढील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.