मराठी रंगभूमीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या दिवाळीत रंगभूमी नव्या नाट्यसंपन्नतेने भरून जाणार आहे. जुन्या दिग्गज नाटकांच्या पुनरुज्जीवनासोबतच नवनवीन संहिता आणि तरुण कलाकारांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सत्रात सामाजिक वास्तव, आधुनिकता आणि मनोरंजनाचा संगम रंगमंचावर पाहायला मिळणार आहे.
विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाईंडर पुन्हा रंगभूमीवर अवतरत आहे. सयाजी शिंदे या प्रमुख भूमिकेत नवे दम घेऊन समोर आले आहेत. नेहा जोशी, अभिजीत झुंजारराव, अनुष्का विश्वास आणि चरण जाधव यांच्या टीमसह हे नाटक स्त्री-पुरुष संबंधांवर आधारित असून प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. 1972 मध्ये लिहिलेल्या या नाटकाने पारंपरिक तंत्राला धक्का दिला होता आणि आजही त्याचा प्रभाव ताजातवाना आहे.
त्याचबरोबर शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला, सविता दामोदर परांजपे, व्यक्ती आणि वल्ली अशा पुनरुज्जीवित नाटकांमुळे प्रेक्षकांना जुन्या आठवणींचा ठेवा तर तरुण संहितांमुळे नवनवीन अनुभव मिळणार आहेत.
गजेंद्र अहिरे लिखित आणि दिग्दर्शक शेवग्याच्या शेंगा पुन्हा रंगमंचावर आले असून ऐश्वर्या नारकर- अविनाश नारकर यांची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. त्याचबरोबर निपुण धर्माधिकारी लिखित नाट्यसंगीताची वाटचाल या नाटकात गायक राहुल देशपांडे, प्रियंका बर्वे आणि अभिनेता अमेय वाघ रंगमंचावर दिसणार आहेत. हे नाटक जुनी नाट्यपरंपरा आणि संगीताचा अद्भुत संगम साकारणार आहे.
संजय मोने लिखित सेकंड इनिंग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विजय केंकरे दिग्दर्शित माणूस नावाचा दिवटा आणि करायचं प्रेम तर मनापासून या नाटकांनीही रसिकांचे मनोरंजन करण्याची तयारी केली आहे. याशिवाय अभिजीत खाडे दिग्दर्शित शांती ते क्रांती आणि ऋषिकेश जोशी दिग्दर्शित संगीत संन्यस्त खड्ग या नाटकांमुळे रंगभूमीवर उत्साहवर्धक वातावरण तयार होणार आहे.
सप्टेंबर ते डिसेंबर हा मराठी रंगभूमीसाठी नाट्यप्रयोगांचा हंगाम मानला जातो. यंदा तरुण लेखक, हौशी कलाकार आणि दिग्गज दिग्दर्शक यांच्या जोडीने रंगभूमीवर नवनवीन प्रयोग येत आहेत, त्यामुळे प्रेक्षकांसाठी उत्साहाचा आल्हादकारक अनुभव निश्चित आहे