Devendra Fadnavis on Awhad VS Padalkar : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असताना, विधिमंडळाच्या परिसरात बुधवारी एक धक्कादायक प्रकार घडला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शाब्दिक खटकेबाजीनंतर आज थेट त्यांचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादाची परिणती या गोंधळात झाली. दोन दिवसापासून गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड या दोन्ही नेत्यांची चिडवाचिडवी सुरु होती. आज दोन्ही नेत्यांच्यामध्ये विधानभवनाच्या परिसरात दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यापार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यामांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
त्यावेळेस ते म्हणाले की, "अध्यक्ष आणि सभापतीच्या अंतर्गत हा सर्व परिसर येतो. त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी यांची गंभीर दखल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई ही माननीय अध्यक्षांनी करावी. अश्या प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे. मला असं वाटतं की एकतर याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात, मारामारी करतात. हे या विधानसभेला शोभणारे नाही."