महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा आहेत. पण त्यातही एका शाळेचा गवगवा संपूर्ण जगभरात सुरू झाला आहे. कारण जिल्हा परिषदेच्या या शाळेत जागतिक दर्जाचं शिक्षण दिलं जातं. इतकंच नाही तर या शाळेत जगभरातील अनेक भाषा शिकवल्या जातात. म्हणूनच, या शाळेची नोंद जगभरातील टॉप-10 शाळांमध्ये झाली. ही किमया साधलीय एक अवलिया शिक्षकानं वाचूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...
पुण्याच्या राजगुरूनगर तालुक्यातील ही शाळा आहे. जालिंदरनगरची ही जिल्हा परिषदेची शाळा सुरू होऊन अनेक वर्ष झाली. पण या वस्तीशिवाय फार कुणाला ही शाळा माहीतही नव्हती. पण आता या शाळेचा बोलबाला फक्त महाराष्ट्रात, भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात या शाळेचा डंका वाजलाय. T4 Education या जागतिक संस्थेने घेतलेल्या वर्ल्ड बेस्ट स्कूल स्पर्धेत या शाळेची निवड टॉप-10 मध्ये झालीय. महत्त्वाचं म्हणजे या शाळेत भारतीय भाषांसह अनेक आंतरराष्ट्रीय भाषाही शिकवल्या जातात.
आपली मुलं ज्या शाळेत जातात, त्या शाळेचा गवगवा जगभरात झाल्यामुळे आणि आपल्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळत असल्याने पालकांनी आनंद व्यक्त केलं आहे .2022 साली या शाळेत एक अविलया शिक्षक बदली होऊन आला. त्या शिक्षकाचं नाव आहे, दत्तात्रय वारे गुरूजी अवघ्या तीन वर्षांतच वारे गुरुजींना शाळेचा चेहरा मोहरा बदलला. एक शिक्षक काय किमया करू शकतो, हे याआधी वारे गुरूजींनी दाखवून दिलंय. शिरूरच्या वाबळेवाडीत त्यांनी झीरो एनर्जी शाळा सकारली होती. आता त्यांनी जालिंदरनगरची शाळा जगातील शाळांच्या पंगतीत नेऊन बसवलीय.
आता या शाळेसाठी जागतिक स्तरावर ऑनलाईन मतदान प्रक्रिया पार पडणारे आहे. त्यातून तब्बल एक कोटी रूपयांचं बक्षीस शाळेला मिळेल. महत्त्वाचं म्हणजे, या जागतिक स्पर्धेत पहिल्यांदाच सरकारी शाळेची निवड झाली आहे. हल्ली जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की अनेकजण नाकं मुरडतात. खासगी शाळा म्हणजे चांगल्या शिक्षणाचं केंद्र, असं काही पालकांना वाटतं. मात्र जालिंदरनगरच्या या जिल्हा परिषदेच्या शाळेनं या सगळ्या गैरसमजांना झुगारून टाकत, जगात झेंडा फडकावलाय.