(Golden Temple ) सुवर्ण मंदिराला बॉम्बहल्ल्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी (SGPC) ने सुवर्ण मंदिर, त्याची परिक्रमा, लंगर हॉल आणि सराय भागात अतिरिक्त सुरक्षा उपाय राबवले आहेत. टास्क फोर्सला विशेष निरीक्षणाचे आदेश देण्यात आले असून कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल दिसल्यास त्वरित कारवाईचे निर्देश दिले गेले आहेत. SGPC चे मुख्य सचिव कुलवंत सिंह मनण यांनी या बाबत माहिती दिली आहे.
या धमकीची माहिती स्थानिक पोलीस ठाणे आणि अमृतसर पोलीस आयुक्तांना देण्यात आली आहे. SGPC चे अध्यक्ष हरजिंदर सिंह धामी यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हा ईमेल भीती पसरवण्यासाठी मुद्दाम पाठवण्यात आल्याचे दिसते.
या पार्श्वभूमीवर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सजग झाल्या असून मंदिर परिसरात CCTV निरीक्षण वाढवण्यात आले आहे. भाविक आणि पर्यटकांची बारकाईने तपासणी सुरू आहे. नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणताही संशयास्पद प्रकार दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.