फुलंब्री तालुक्यातील खंबाट वस्ती (पाथरी) या छोट्याशा गावात घडलेल्या एका धक्कादायक आरोग्यप्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ३० महिन्यांचा बालक, ९ वर्षांचा मुलगा आणि ११ वर्षांचा मुलगा – हे तिघेही एकाच कुटुंबातील आणि नातेसंबंध असलेले असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. या तिन्ही बालकांना अचानक लुळेपणा आणि तीव्र अशक्तपणा जाणवू लागला, ज्यामुळे पालकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
पहिल्या प्रकरणात १२ जुलै रोजी ९ वर्षीय मुलाला, त्यानंतर १६ जुलैला ११ वर्षीय मुलाला आणि शेवटी १७ जुलैला ३० महिन्यांच्या बालकाला छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या दोन बालकांवर पीआयसीयू (PICU) मध्ये उपचार सुरू असून एकावर सामान्य वार्डात उपचार होत आहेत.
या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं तातडीने हालचाली सुरू केल्या. बडोदबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत संपूर्ण गावात सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. या लक्षणांच्या पार्श्वभूमीवर अॅक्युट फ्लॅसीस पॅरॅलिसिस (AFP) संशयित रुग्ण म्हणून तिघांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे हे प्रकरण पोलिओ किंवा गीलियन बेरे सिंड्रोम (GBS) असण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
आरोग्य यंत्रणेनं वेळीच हस्तक्षेप करत या बालकांचे मलाचे (स्टूल) नमुने तपासणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV), पुणे येथे पाठवले आहेत. दरम्यान, संभाव्य संसर्गाचा स्रोत म्हणून गावातील पिण्याच्या पाण्यावर संशय घेण्यात येत असून, सर्व सार्वजनिक जलपुरवठा स्रोत तात्काळ बंद करण्यात आले आहेत. त्या जागी सध्या निर्जंतुक पाण्याचा पर्यायी पुरवठा केला जात आहे.
तिघेही मुलं एकाच कुटुंबातील असल्याने व त्यांना एकाच प्रकारची लक्षणं जाणवत असल्याने हे प्रकरण केवळ एक आरोग्यसंकट नसून संभाव्य विषबाधा किंवा संसर्गजन्य आजाराच्या दिशेने निर्देश करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या प्रकरणामुळे फुलंब्री तालुक्यात आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर वातावरण निर्माण झाले असून, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तपासणी अहवाल येईपर्यंत सतर्कता बाळगण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.