जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशभरातून आलेल्या अनेक पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. या भ्याड हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली शहरातील पूर्व व पश्चिम भागातील नवपाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरातील तीन रहिवाशांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या तिघांची नावे हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने अशी आहेत. हे तिघेही पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते. गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी परिसरातील श्रीराम अचल इमारतीत राहणारे होते आणि परळ येथील रेल्वे वर्कशॉपमध्ये सेक्शन इंजिनीयर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सोबत हेमंत जोशी आणि संजय लेले हे दोघेही डोंबिवलीतील वेगवेगळ्या परिसरात राहणारे होते. हे तिघे एकत्र पर्यटनासाठी पहलगामला गेले होते.
या घटनेमुळे डोंबिवलीत हळहळ व्यक्त केली जात असून, मृतांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी स्थानिक प्रशासन व नागरिक पुढे सरसावले आहेत. दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांवर गोळीबार केला. या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.