असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये इक्विटी फंडांमध्ये केवळ 33,430 कोटींची गुंतवणूक झाली, तर जुलै महिन्यात ती विक्रमी 42,000 कोटींवर पोहोचली होती. एसआयपी इन्फ्लोही किंचित कमी झाला असून, जुलैतील 28,464 कोटींच्या तुलनेत ऑगस्टमध्ये तो 28,265 कोटींवर आला.
कॅटेगरीनुसार पाहता, फ्लेक्सी कॅप फंडांनी सर्वाधिक म्हणजे 7,679 कोटींचा इनफ्लो नोंदवला. मिडकॅप फंडांत 5,330 कोटी, स्मॉलकॅप फंडांत 4,993 कोटी, लार्ज कॅप फंडांत 2,835 कोटी, तर सेक्टरल/थीमॅटिक फंडांत 3,893 कोटींची गुंतवणूक झाली. ईएलएसएसमध्ये इनफ्लो केवळ 59 कोटी राहिला. ऑगस्टमध्ये 23 नवीन फंड लाँच झाले असून, त्यातून 2,859 कोटींचा इनफ्लो झाला आहे.
डेट फंडांच्या बाबतीत मात्र गुंतवणूक तुलनेने स्थिर राहिली. ओपन-एंडेड डेट फंडांत ऑगस्ट महिन्यात 7,980 कोटींची वाढ झाली. एकूणच, ऑगस्टमध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत 52,443 कोटींची गुंतवणूक झाली, जी जुलैतील ₹1.8 लाख कोटींशी तुलना करता लक्षणीयरीत्या कमी आहे. महिन्याच्या अखेरीस देशातील असेट अंडर मॅनेजमेंट (AUM) 75.2 लाख कोटींवर पोहोचले.
या घडामोडींवर मत व्यक्त करताना मिरे असेटचे हेड ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड स्ट्रॅटेजिक अलायन्सेस, सुरंजना बोर्थाकुर यांनी सांगितले की, मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडांचे मूल्यांकन महाग वाटत असूनही गुंतवणूकदारांचा कल या कॅटेगरीकडे कायम आहे. गेल्या दोन महिन्यांत या फंडांत तब्बल 10,000 कोटींची गुंतवणूक झाली आहे, ज्यातून गुंतवणूकदारांचा दीर्घकालीन दृष्टिकोन स्पष्ट दिसतो.
त्यांनी पुढे सांगितले की, मागील महिन्यातील मुख्य वाढ सेक्टरल फंडांतून झाली, ज्यात जवळपास 7,000 कोटींचे एनएफओ समाविष्ट होते. हायब्रीड फंडांत मात्र घसरण झाली असून त्यांचा इनफ्लो 15,000 कोटींवर आला आहे. तथापि, एसआयपी स्थिर राहणे हे बाजारासाठी सकारात्मक संकेत असल्याचे बोर्थाकुर यांनी नमूद केले.