राज्यातील वाघांच्या वाढत्या मृत्यूंची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. २०२५ च्या सुरुवातीच्या अवघ्या २२ दिवसांत ११ वाघांचा मृत्यू झाल्याPublicInterestLitigationची माहिती समोर आली असून, जानेवारीच्या पहिल्याच काही दिवसांत चार वाघ दगावल्याचे नोंदवले गेले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणाची दखल घेत जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी, वाघांच्या मृत्यूचा मुद्दा आता थेट न्यायालयीन प्रक्रियेत गेला आहे.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. चार वर्षांपूर्वी T1C1 हा वाघ रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्यानंतर, वन्यजीव विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पातून ३६ महिन्यांचा PKT7CP1 हा वाघ ३ जानेवारी रोजी ज्ञानगंगा अभयारण्यात आणला होता. मात्र या वाघाला अभयारण्यात जाळी लावून मर्यादित अधिवासात ठेवण्यात आले होते. काल रात्री या वाघाने जाळी तोडून अभयारण्यातून पोबारा केला, त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ज्ञानगंगा अभयारण्यातून बुलढाणा–खामगाव महामार्ग क्रमांक 753E जात असून, या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. त्यामुळे फरार वाघाच्या सुरक्षेला तसेच प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वाघ मुक्त संचार करत असल्याने वन विभागाने आसपासच्या गावांतील नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मात्र वाघाच्या संरक्षणासाठी अभयारण्यातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक नियंत्रित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दुसरीकडे, भंडारा जिल्ह्यातील अड्याळ वनपरिक्षेत्रात एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. अड्याळ–किटाळी मार्गावरील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात एका रुबाबदार वाघाने पहाटे वाहनधारकांचा रस्ता अडवला. सुमारे १५ ते २० मिनिटे वाघ रस्त्यावर ‘रॉयल वॉक’ करत असल्याचे व्हिडिओत दिसत असून, वाहनधारकांना गाडी रिव्हर्स घेण्यास भाग पाडण्यात आले. या घटनेनंतर परिसरात वन विभागाची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, भंडारा वन विभागाने रानडुकरांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. पिकअप वाहनातून रानडुकरांची नागपूरकडे वाहतूक होत असताना बेरोडी पुनर्वसन परिसरात सापळा रचून कारवाई करण्यात आली. रानडुकरांना जंगलात सोडून देत त्यांना जीवदान देण्यात आले असून, आरोपींविरोधात वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.