मुंबईमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा लोकलप्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाला आरामदायी बनवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लोकलच्या माल डब्यामध्ये आवश्यक ते बदल करून तो डब्बा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. यामुळे आता या लोकलच्या जीवघेण्या गर्दीमधून प्रवास करताना जेष्ठ नागरिकांसाठी आणखी काही आसनांची व्यवस्था झाल्याने जेष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुंबईमध्ये लाखो लोक दररोज मुंबईची लाईफलाईन रेल्वेने प्रवास करत असतात. या गर्दीमध्ये महिला, लहान मुले आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यांना कुठेही प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा असा डब्बा नसल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत होती. गरोदर स्त्रियांना आणि ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेमध्ये काही आसने राखीव असली तरी गर्दीच्यावेळी या डब्यामधूनही प्रवास करणे खुप कठीण जात होते. त्यातच दिव्यांग प्रवाशांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा एक स्वतंत्र डब्बा असावा अश्या आशयाची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती त्यावर ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डब्बा तयार करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले होते .याच आदेशाचे पालन करत रेल्वेने लोकलच्या मालडब्यात बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी तो डब्बा प्रवासासाठी खुला केला आहे. मध्य रेल्वेने लोकलमधील एका मालडब्याचे रुपांतर प्रवासी डब्यात करुन तो डबा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
यासंदर्भात माटुंगा कारखान्यात मालडब्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. येत्या वर्षभरात मध्य रेल्वेच्या ताफ्यातील 163 लोकलमध्ये आणि पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील 105 गाड्यांमध्ये मालडब्यांचे रूपांतर राखीव प्रवासी डब्यात करण्यात येणार आहे. याबद्दलचा पहिला लोकल रेक तयार झाला असून लवकरच तो जेष्ठ नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे.
हेही वाचा....