नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने मोठा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो-३ (‘ॲक्वालाईन’) रात्रभर सुरू राहणार आहे. यामुळे मध्यरात्री घरी परतताना प्रवाशांना टॅक्सी किंवा रिक्षासाठी प्रतीक्षेत राहण्याची गरज भासणार नाही.
विशेष रात्रभर सेवा ३१ डिसेंबर रोजी रात्री १०:३० वाजल्यापासून सुरू होईल आणि १ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ५:५५ वाजेपर्यंत चालेल. त्यानंतर १ जानेवारीपासून मेट्रोची नियमित सेवा सकाळी ५:५५ वाजल्यापासून नेहमीप्रमाणे सुरू होईल. यामुळे प्रवाशांना ३१ डिसेंबरच्या सकाळी सुरू झालेली सेवा सलग १ जानेवारीच्या पहाटपर्यंत उपलब्ध राहणार आहे.
मुंबईत नववर्षाच्या स्वागतासोबत गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढते. या काळात रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळणे आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. विशेषतः महिला आणि कुटुंबियांसाठी रात्रभर मेट्रो सेवा अत्यंत सोयीची ठरणार आहे. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, नववर्षाचा आनंद साजरा करताना मेट्रोच्या नियमांचे पालन करावे आणि या सुविधेचा लाभ घ्यावा.
मुंबई मेट्रो लाईन ३ चे प्रमुख स्थानक सायन्स म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड येथे आहेत. हा टप्पा दक्षिण मुंबईतील मुख्य भागांना जोडतो. अॅक्वा लाईनमुळे प्रवाशांना मोठा फायदा होईल आणि प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. तसेच, वाहतुकीवरही सकारात्मक परिणाम होणार आहे आणि रस्त्यांवरील कोंडी कमी होण्यास मदत होईल.
मेट्रो-३ मार्गाचे बांधकाम गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. २०१७ मध्ये या प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले होते. तथापि, तांत्रिक, पर्यावरणीय आणि प्रशासकीय आव्हाने यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाला. महत्त्वाचे म्हणजे, सीएसएमटीसारख्या वारसा स्थळांना नुकसान न होता संवेदनशील बांधकाम तंत्रांचा वापर करून मार्गिका तयार करण्यात आली आहे. या प्रकल्पावर एकूण ₹३७,२७६ कोटी खर्च झाला आहे. मुंबईकरांसाठी रात्रभर मेट्रो सेवा हा आनंददायक उपक्रम असून, प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायक प्रवासासाठी ही सुविधा मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरणार आहे.