आज आपल्या भारत देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. देशातील लोकशाहीचा विजयाचा दिवस म्हणून याकडे पाहिले जाते. 26 जानेवारी या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालवण्याचा अधिकार मिळाला. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश अशी भारताची ओळख आहे.
भारतामध्ये विविध भाषा, विविध धर्म, वेगवेगळ्या संस्कृती पाहायला मिळतात. तरीही भारतातील नागरिक गुण्यागोविंदाने, एकोप्याने नांदतात. प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणानिमित्त सर्व नागरिक एकत्र येऊन हा दिन साजरा करतात. देशाच्या प्रती असलेलं प्रेम आणि अभिमान जागृत करण्याचा हा दिवस आहे. दिल्ली, मुंबईसह राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलन सोहळा
दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाचे संचलन सकाळी 10. 30 वाजता सुरू होईल आणि सुमारे 90 मिनिटे हा कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो हजेरी लावणार आहेत. कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात इंडोनेशियाचे मार्चिंग पथक आणि बँड पथकदेखील सहभागी होणार आहे.
‘सुवर्ण भारत : वारसा आणि विकास’
यंदाच्या चित्ररथांसाठी ‘सुवर्ण भारत : वारसा आणि विकास’ ही संकल्पना आहे. या संकल्पनेच्या आधारावर महाराष्ट्राने ‘मधाचे गाव’ असा चित्ररथ साकारला आहे. मधमाशांचे पर्यावरणाच्या आणि मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. मधाचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेऊन, स्थानिक रोजगार निर्मिती आणि उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने 2022 मध्ये ‘मधाचे गाव’ ही योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश स्थानिक रोजगार निर्मिती करणे आणि गावे आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे. त्याचबरोबर पर्यटन व पर्यावरण यासाठीही ही योजना महत्त्वाची आहे.
महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात परवानगी नाही
महाराष्ट्राचा चित्ररथ 'मधाचे गाव' तयार करण्यात आला होता. महाबळेश्वर मधल्या मांघर या गावाची यशोगाथा या चित्ररथातून साकारण्यात आली आहे. चित्ररथावर फुलांवर बसलेल्या मधमाशीचे आकर्षक शिल्प साकारण्यात आलं आहे. या मोठ्या राणी मधमाशीभोवती इतर लहान मधमाशा दाखवण्यात आल्या आहेत. तर चित्ररथाच्या मागच्या बाजूस एक मधमाशाचे भलंमोठं पोळ साकारण्यात आलं आहे. मात्र, महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात परवानगी नाही. यंदा १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांची निवड करण्यात आली.