नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून आज (22 डिसेंबर) अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. दरम्यान आज नागपुरात तब्बल 12 मोर्चे निघणार आहेत. यातला पोलीस पाटील संघटनेचा मोर्चा महत्वाचा असणार आहे. तसेच कोकणातील रिफायनरी विरोधक आज नागपुरात एक दिवसाच आंदोलन करणार आहे. 54 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यांवर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आता आज सभागृहात पुरवण्या मागण्या मंजूर करण्यात येणार आहेत.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून नागपूर न्यास जमीन विक्रीच्या प्रकरणाच्या मुद्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याच्या प्रयत्न केला आहे. विरोधक आज विधीमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही आक्रमक होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीचे सत्र सुरु होण्यापूर्वी सत्ताधारी भाजप-शिंदे गटाचे आमदार आणि विरोधक पुन्हा आमने सामने आले होते. भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच बोगस आदिवासी कायम करून खऱ्या आदिवासींवर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध, असे फलक घेऊन अकोले येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी विधानभवन परिसरात नारेबाजी केली.
भूखंड विक्रीबाबत घेतलेला निर्णय हा नियमांनुसार घेतला असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यानी सांगितले. हे प्रकरण कोर्टात आहे, याची माहिती आपल्याला देण्यात आली नव्हती असेही त्यांनी म्हटले. आम्ही तुमच्या सारखे नसून बिल्डरकडून 350 कोटी आम्ही लुटून कोणाच्या घशात घातलेले नाही असा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हल्लाबोल केला होता.