थोडक्यात
ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस
ज्यांनी आयटीआर फाईल केला नाही त्यांनी तातडीनं आयटीआर फाईल करणं आवश्यक
आयटीआर फाईल न केल्यास करदात्यांना 5000 रुपयांपर्यंत दंड द्यावा लागू शकतो
(Income Tax Return Filing) आर्थिक वर्ष 2024-25 (असेसमेंट इयर 2025-26) साठी आयटीआर फाईल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. ज्यांनी अजूनही आपला रिटर्न दाखल केलेला नाही, त्यांनी तातडीने आयकर विभागाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
या वर्षी आयटीआर फॉर्ममध्ये काही बदल आणि तांत्रिक दुरुस्त्या झाल्यामुळे करदात्यांना 31 जुलै ऐवजी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. फॉर्म अपडेट, TDS क्रेडिट रिफ्लेक्शन आणि फायलिंग सिस्टीममध्ये सुधारणा करण्यासाठी हा कालावधी मिळाला होता.
जर करदात्यांनी दिलेल्या तारखेपर्यंत आयटीआर फाईल केला नाही, तर त्यांना इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 234F अंतर्गत दंड भरावा लागणार आहे. उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास 5000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल, तर 5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांना 1000 रुपयांचा दंड द्यावा लागू शकतो.
उशिरा रिटर्न फाईल करणाऱ्यांना केवळ दंडच नाही तर इतर अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. जाणीवपूर्वक करचोरी केल्यास तीन महिने ते दोन वर्ष तुरुंगवासाची तरतूद आहे. तरीही, विलंबित आयटीआर फाईल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. सध्या 6 कोटींपेक्षा अधिक करदात्यांनी आपले रिटर्न्स भरल्याचं आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे.