27 मार्च रोजी विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. दरम्यान 10 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे राजकीय पक्षांमध्ये वेग पाहायला मिळत आहे. तसेच 17 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 20 मार्च आहे. त्याचसोबत उमेदवारी अर्जाचे परीक्षण 18 मार्चला होणार आहे.
अस असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जातेय. आज दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवर बैठक होणारे. या बैठकीत एका नावावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. कोअर कमिटीने निश्चित केलेल्या नावांपैकी काही नावांवर आज चर्चा होईल. राजेश विटेकर विधानसभेत गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा रिक्त आहे.
या जागेसाठी 100 हून अधिक इच्छुकांचे अर्ज आले आहेत. बैठकीनंतर उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात येणार असून, सध्या पक्षाकडून विधान परिषदेसाठी कागदपत्रं गोळा करण्याच्या सुचना झिशान सिद्धकी, संजय दौंड, उमेश पाटील यांना देण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे या तिघांपैकी एकाला विधानपरिषदेवर संधी मिळणार असल्याचं बोलल जात आहे.
तर दुसरीकडे भाजपकडून तीन उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे भाजपकडून दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी या तीन उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. तसेच विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 3 जागा भाजपसाठी आहेत तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाची एक जागा आहे.