मुंबईकरांसाठी 2 ऑक्टोबर हा दिवस फक्त दसऱ्याचा सण नाही तर मोठ्या राजकीय मेळाव्यांमुळे वाहतुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे. शिवाजी पार्क येथे शिवसेना (ठाकरे गट) आणि आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होणार असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी काही प्रमुख मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून पर्यायी मार्गांची माहिती जाहीर केली आहे.
शहरातील दादर आणि शिवाजी पार्क परिसरात अनेक रस्त्यांवर वाहतुकीस मर्यादा घालण्यात आल्या आहेत. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, केळूस्कर रोड, एम. बी. राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दादासाहेब रेगे मार्ग, दिलीप गुप्ते मार्ग तसेच एन. सी. केळकर रोड यांसारख्या महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. तसेच एल. जे. रोडचा काही भागही वाहतुकीसाठी बंद असेल.
या बंदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांनी पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे. उदाहरणार्थ, सिद्धी विनायक मंदिर जंक्शनवरून जाणाऱ्या वाहनांनी एस. के. बोले रोड, आगार बाजार आणि गोखले रोडचा वापर करावा. तसेच गडकरी चौक किंवा राजा बडे चौक परिसरात जाणाऱ्या वाहनांना एल. जे. रोड व एम. बी. राऊत रोड हे पर्याय उपलब्ध असतील.
वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की, दसऱ्याच्या दिवशी मोठ्या संख्येने गाड्या ये-जा करणार असल्याने रहदारीत अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी शक्य तितक्या प्रमाणात सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करावा. खाजगी वाहनांचा वापर टाळल्यास गर्दी कमी होण्यास मदत होईल.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की प्रवासापूर्वी वाहतूक सल्ला (Traffic Advisory) नीट तपासूनच बाहेर पडावे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास सर्वांच्या सोयीस्कर प्रवासाला मदत होईल आणि दसऱ्याचा दिवस कोणत्याही अडथळ्याशिवाय साजरा करता येईल.