ताज्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कर्करोग उपचारांसाठी उपयुक्त EV हबचे लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत 'ट्रू बीम डिव्हाइस'चे लोकार्पण करण्यात आले.

Published by : Team Lokshahi

मराठवाड्याच्या वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्राला ऐतिहासिक चालना देणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत 'ट्रू बीम डिव्हाइस'चे लोकार्पण करण्यात आले. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त या उपकरणामुळे कर्करोग रुग्णांना जलद आणि अचूक उपचार मिळणार आहेत.

वैद्यकीय क्षेत्रात नवे युग सुरू

शासकीय कर्करोग रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या या सोहळ्यात, केंद्रीय मंत्री नड्डा यांनी सांगितले की, "कर्करोगाचा सामना आता वेळेवर आणि आक्रमक उपचारांनी केला जाईल. देशभरात आरोग्य मंदिरांची साखळी तयार करत आहोत, ज्यातून लाखो नागरिकांना वेळेवर निदान व उपचार मिळणार आहेत." प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे गरीबांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य संरक्षण मिळाल्याचे सांगत त्यांनी असेही जाहीर केले की, “प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग उपचार केंद्र उभे राहणार आहेत." त्याचबरोबर देशभरात १०० नवीन मेडिकल व नर्सिंग कॉलेज उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक भविष्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "पुणे-मुंबई प्रमाणेच आता छत्रपती संभाजीनगर आणि जालना हेही राज्याचे महत्त्वाचे मॅन्युफॅक्चरिंग हब बनतील. DMIC अंतर्गत सुरू झालेली स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी याचे ठळक उदाहरण आहे."

फडणवीस यांनी मोठ्या उत्साहात जाहीर केले की, "८ हजार हेक्टर नवीन औद्योगिक जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. EV हब म्हणून छत्रपती संभाजीनगरचा झपाट्याने विकास केला जाईल. भव्य प्रदर्शन केंद्र आणि इंडस्ट्रियल रिंग रोड तयार केला जाईल. फ्लायओव्हर प्रकल्पांद्वारे वाहतूक सुरळीत केली जाईल. जायकवाडी धरणावर देशातील सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर प्रकल्प उभारला जाईल. बाहेरून आलेला उद्योजक एकदा इथे आला, की पुन्हा परत जात नाही," असे सांगत त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.

मराठवाड्याला दुष्काळमुक्तीचे स्वप्न

दुष्काळाशी सातत्याने लढणाऱ्या मराठवाड्यासाठीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी धगधगतं आश्वासन दिलं "समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून ५० टीएमसी पाणी आणण्याचे ध्येय निश्चित केले आहे. पुढच्या ५-६ वर्षांत मराठवाडा दुष्काळमुक्त करू!" त्याचबरोबर, सांगली-कोल्हापूरच्या पुराचे पाणी उजनीच्या माध्यमातून मराठवाड्यात वळवण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

शक्तिपीठ महामार्गाने मराठवाड्याचा कायापालट

“शक्तिपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याचा व्यापारी आणि औद्योगिक चेहरा बदलेल. हा महामार्ग संपूर्ण प्रदेशाला नवसंजीवनी देईल,” असे सांगत फडणवीस यांनी विकासाच्या नव्या शक्यता उलगडल्या. ते मिश्किलपणे म्हणाले, “CMIA च्या नावात CM आहे, त्यामुळे तुम्हाला माझी फारशी गरज नाही,” आणि उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना पदोन्नती किंवा आर्थिक लाभ होईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार