थोडक्यात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक तणाव वाढवणारा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाला तात्काळ अण्वस्त्र चाचण्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता निर्माण झाली असून, रशियाने अमेरिकेला तत्काळ इशारा दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक तणाव वाढवणारा निर्णय घेतला आहे. त्यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला तात्काळ अण्वस्त्र चाचण्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता निर्माण झाली असून, रशियाने अमेरिकेला तत्काळ इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, “रशिया आणि चीन यांनी अण्वस्त्र चाचण्या सुरु ठेवल्या आहेत. अमेरिकेला आता मागे राहता येणार नाही. आमच्या सुरक्षा आणि सामरिक सामर्थ्यासाठी या चाचण्या गरजेच्या आहेत.” या विधानामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
रशियानेही थेट प्रतिसाद दिला आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणतात, “जर अमेरिका अण्वस्त्र चाचण्या पुन्हा सुरू करत असेल, तर आम्हीही आवश्यक ती पावले उचलू. परिस्थिती गंभीर असल्यास योग्य प्रत्युत्तर दिले जाईल.” त्यांनी भर दिला की अशा निर्णयांमुळे जागतिक शांततेला धोका निर्माण होऊ शकतो, पण रशिया संयम राखेल. गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव वाढत आहे. रशियाने अलीकडेच क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती, त्यानंतर अमेरिकेनेही अण्वस्त्र चाचण्यांसाठी परवानगी दिली आहे.
१९९२ नंतर अमेरिकेने प्रत्यक्ष अण्वस्त्र चाचणी केलेली नाही. त्या नंतर “Comprehensive Nuclear-Test-Ban Treaty” कराराखाली सर्व देशांना चाचण्या थांबवण्याचे आवाहन केले गेले होते. ट्रम्प यांच्या आदेशामुळे आता त्या कराराची अंमलबजावणी प्रश्नाखाली आली आहे. जगातील दोन प्रमुख अण्वस्त्र शक्तींमधील हा नविन तणाव पुन्हा एकदा ‘शीतयुद्धा’सारखे वातावरण निर्माण करू शकतो. संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर जागतिक नेत्यांनी दोन्ही राष्ट्रांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.