डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
सकाळी उठल्यानंतर, तासनतास काम केल्याने देखील अनेकांना थकवा जाणवतो. थकवा दूर करण्यासाठी आपण घरगुती उपाय करु शकतो. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही ही हा उपाय करु शकता. उत्तम प्रतीचा बाभळीचा डिंक घ्यावा. तो साजूक तुपामध्ये तळला की लाह्यासारखा फुलतो.
एक वाटीभर डिंकाची लाही असेल, तर त्यात एक वाटी खारीकची पावडर, अर्धी वाटी बारीक केलेली खडीसाखर, दोन चमचे खमंग भाजून घेतलेली खसखस, दोन चमचे भाजून घेतलेलं खोबरं या सर्व गोष्टी एकत्रित कराव्यात.
आता मिक्सरच्या मदतीनी मिक्स करून तयार केलेलं चूर्ण डब्यामध्ये भरून ठेवावं. रोज सकाळी एक मोठा चमचा भरून हे मिश्रण खावं आणि वरून दूध प्यावं. मधुमेह असणाऱ्यांनी यात खडीसाखर थोडी कमी घातली तरी चालेल, पण खडीसाखरेमुळे हा उपाय अंगी लागायला चांगली मदत होते. अधिक चांगला गुण यावा यासाठी यातच पाव चमचा जायफळाची पूड आणि दोन चिमूट केशराची पूड मिसळता येते.