स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका तू ही रे माझा मितवा सध्या रंगतदार वळणावर पोहोचली आहे. ईश्वरी आणि अर्णव यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी ईश्वरी प्रयत्न करत असताना, अर्णवच्या आयुष्यात पुन्हा एकदा गोंधळ उडणार असल्याचे संकेत नव्या प्रोमोमधून मिळत आहेत.
प्रोमोमध्ये काय घडतंय?
नवीन प्रोमोमध्ये राकेश ईश्वरीचा पाठलाग करताना दिसतो. घाईगडबडीत ईश्वरी शिडीवरून घसरते. तिच्या हातात राकेशचे चेकबुक असल्याने तो चिडलेला असतो. ती कोणत्याही परिस्थितीत त्याचा डाव हाणून पाडणार असल्याचं सांगते. रागाच्या भरात राकेश तिच्यावर हल्ला करणार इतक्यात अर्णव तिथे येतो आणि राकेशला चोख प्रत्युत्तर देतो.
अंजलीसमोर सत्य येणार का?
अर्णव आणि राकेश यांच्यात जोरदार झटापट होते. मात्र, अंजली आणि आजी वेळेवर पोहोचतात. अंजली अर्णवला थांबवते. आता प्रश्न असा आहे की, अर्णवच्या या कृतीमुळे अंजली दुखावणार की राकेशचा खरा स्वभाव तिच्यासमोर उघड होणार? आगामी भागांमध्ये या नात्यांचा पुढचा प्रवास प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवणार आहे.